जळगाव। किरकोळ कारणावरून चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजीव गांधीनगरातील तरूणाचा मुंबईला उपचारासाठी नेत असताना नाशिक येथे वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. यामुळे शुक्रवारी राजीवगांधी नगरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली मात्र, इतर संशयित फरार झाले होते. शनिवारी रामानंदनगर पोलिसांनी चाकू हल्ल्यातील मुख्य संशयित सत्यासिंग मायासिंग बावरी हा पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना याला रेल्वे स्टेशन परिसरातून अटक केली. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची पोलिस कोठडीत रवागनी करण्यात आली आहे.
अशी घडली होती घटना
राजीव गांधीनगरातील राहुल प्रल्हाद सकट (वय 25) हा बुधवारी रात्री 10 वाजता घरी जेवण करीत असताना सत्यासिंग मायासिंग बावरी,रवींद्रसिंग मायासिंग बावरी, मलिनसिंग मायासिंग बावरी, रवींद्रसिंग मायासिंग बावरी, मालासिंग मायासिंग बावरी,कलाबाई मायासिंग बावरी यांनी सकट कुटुंबीयांवर हल्ला केला होता. त्यात सत्यासिंग याने राहुलच्या डाव्या बरगडीवर चाकूने वार केल्याने त्याचे आतडे बाहेर पडले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलवले होते. डॉक्टरांनी चार शस्त्रक्रियेसाठी जळगाव येथून त्याला मुंबईला उपचारासाठी नेत होते. मात्र, नाशिक जवळच रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी घातली समजूत
नाशिक येथून शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजता राहुलचा मृतदेह आणल्यानंतर नागरिकांनी रामानंद घाटात रुग्णवाहिका थांबवून मृतदेह राजीव गांधीनगरात आणला. त्यावेळी नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याने पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, पोलिस निरीक्षक बी.जी.रोहम यांनी त्यांची समजूत घातली. मात्र, राजीवगांधी नगरात समाजबांधव व नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर नातवाईकांनी शनिवारी अत्यंस्कार करण्याचे ठरविले होते.
पोलिस बंदोबस्तात अंत्यस्कार
शनिवारी सकाळी राहूल यांच्यावर तगड्या पोलिस बंदोबस्तात नेरी नाक्याजवळील वैकुंठधाम येथे अत्यंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईकांसह परिसरातील रहिवासश्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रामानंदनगरचे पोलिस अधिकारीही हजर होते. परंतू, या घटनेमुळे अत्यंस्काराच्या दिवशीही राजीवगांधी नगरात तणावाचे वातावरण असल्यामुळे त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता.
रेल्वेस्टेशन परिसरातून अटक
चाकू हल्ल्यातील मुख्य संशयित सत्यासिंग बावरी हा पळून जाण्याच्या प्रयत्नात असून तो रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची माहिती रामानंदनगर पोलिस ठाण्याचे प्रदिप चौधरी व शरद पाटील यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर त्यांनी लागलीच रेल्वेस्टेशन भागात जावून सत्यासिंग बावरी शोध घेतला. दरम्यान, सत्यासिंग हा रेल्वे स्टेशन परिसरात फिरतांना प्रदिप चौधरी व शरद पाटील यांना दिसून आल्यानंतर त्यांनी त्याला पकडले.सत्यासिंग बावरी हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द पोलिस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. यात त्याच्यावर 1 तडीपार ,3 दरोड्याचे, 4 घर फोडींचे, 2 दंगलीचे तसेच 1 खून व 1 पोलिसावर हल्ला करणे असे गुन्हे पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत.