चानूने संपवला 22 वर्षांचा दुष्काळ

0

जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत 1994 आणि 95 सालीं कर्णम मल्लेश्‍वरीने जिंकले होते सुवर्णपदक

आनाहीम (अमेरिका) । भारताचा 22 वर्षांचा सुवर्णपदकांचा दुष्काळ संपुष्टात आणताना मिराबाई चानूने जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत विश्‍वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले आहे. मीराबाई स्पर्धेतील 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकणारी पहिली आणि जागतिक स्पर्धेत अशी कामगिरी करणारी भारताची दुसरी महिला पॉवरलिफ्टर ठरली आहे. याआधी सिडनी ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती कर्णम मल्लेश्‍वरीने जागतिक स्पर्धेतील 54 किलो वजनी गटात 1994 आणि 1995 मध्ये भारताला हे यश मिळवून दिले होते. भारतीय रेल्वेच्या सेवेत असणार्‍या मिराबाईने स्नॅच प्रकारात 85 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 109 किलो वजन उचलून एकुण 194 किलो वजन उचलत 192 किलोचा आपला राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत नवीन विश्‍वविक्रमही नोंदवला. ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून मिराबाईने पुढील वर्षी होणार्‍या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतले आपले स्थान निश्‍चित केले होते. पदक वितरण समारंभात राष्ट्रध्वज पाहील्यावर मिराबाई काहीशी भावुक झाली होती. थायलंडची सुकचारॉन तुनियाने रौप्यपदक आणि सेगुरा अ‍ॅना इरिसने कांस्यपदक जिंकले. उत्तेजक द्रव्य चाचणी प्रकरणांमुळे रशिया, चीन, कझाकीस्तान, उक्रेन, अझरबैझान या पॉवरलिफ्टिंगमध्ये आघाडीवर असलेल्या देशांनी स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता.

त्यानंतर ती घरीच गेली नाही
विश्‍वविक्रमासह सुवर्णपदक जिंकल्यानंतर मीराबाई म्हणाली की, रिओ ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या अपयशानंतर ती मणिपुरला घरी परत गेलीच नाही. तिने सर्व लक्ष पटियाळा येथील राष्ट्रीय सराव शिबिरावर केंद्रित केले. या काळात आईने महत्वाची अशी साथ दिली, माझे मनोबल वाढवले. सुवर्णपदक जिंकू याचा विचार केला नव्हता पण पदक जिंकूनच परतायचे असा निश्‍चय मात्र
केला होता. आगामी काळात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, एशियाड आणि 2020 साली होणार्‍या ऑलिम्पिकसाठी एक एक करुन तयारी करणार आहे.
यावेळी तीन ऑलिम्पिक पदक जिंकण्याची मनीषा व्यक्त केली.

मीराबाईने रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. 48 किलो वजनी गटातील क्लिन अँड जर्क प्रकारात तिन्ही प्रयत्नांमध्ये वजन उचलण्यात अपयशी ठरल्यामुळे तिला एकूण गुणतालिकेत स्थान मिळवता आले नव्हते. पण यावर्षी मात्र तिने आपल्या कमागिरीने सर्वानांच प्रभावित केले आहे. आता रिओ ऑलिम्पिकमधील अपयश मागे टाकून तिने नवीन इतिहास रचला आहे. याआधी मीराबाईने 2014 मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेची (वाडा) निर्मिती झाल्यानंतर पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताला मिळालेले हे पहिले पदक आहे. 1997 साली भारताच्या एन कुंजाराणी देवीने 46 किलोवजनी गटात रौप्यपदक जिंकले होते.