धर्मशाळा । चौथ्या कसोटीत भारताच्या कर्णधार विराट कोहलीच्या जागी कुलदीप यादवला खेळण्याची संधी मिळाली.त्याने या संधीचे सोने करून दाखविले.यादवने आपल्या वैशिष्टपूर्ण गोलंदाजीने पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाच्या निम्म्यापेक्षा जास्त फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखविला. महत्वाचे म्हणजे तो आशिया खंडातील दुसरा‘ चायनामन ’गोलंदाज आहे. कानपूरच्या या 22 वर्षीय गोलंदाजांचे कौतुक होत असून कसोटी खेळणारा तो भारताचा 288 वा फलंदाज आहे. क्रिकेटमधील देव म्हणजेच सचिन तेंडुलकरनेही ट्विटरवर कुलदीपच्या गोलंदाजीचे भरभरुन कौतुक केले आहे.
यादव आशियातील दुसरा चायनामन
कुलदीप यादव या आशिया खंडातील दुसरा चायनामन गोलंदाज ठरला आहे. चायनामन म्हणजे लेफ्ट आर्म स्पिन. यात मनगटाचा वापर केला जातो. सर्वसामान्यपणे डावखुरा गोलंदाज चेंडू टाकतो तो उजव्या फलंदाजाच्या लेग स्टम्पकडून ऑफ स्टम्पकडे वळतो, म्हणजेच लेगस्पिन होतो. पण काही गोलंदाज हा चेंडू उलट दिशेने म्हणजे गुगलीसारखा वळवण्यात यश मिळवतात. यामुळे फलंदाजाची फसगत होते आणि तो बाद होतो. 1933 साली एलिस अचाँग नावाच्या चिनी वंशज असलेल्या वेस्ट इंडियन गोलंदाजाने प्रथमच अशा प्रकारचा चेंडू टाकल्यामुळे त्याला ‘चायनामन’ म्हटले गेले असे उल्लेख सापडतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर चायनामन गोलंदाजांची संख्या कमी आहे. ऑस्ट्रेलियाचा ब्रॅड हॉग, आफ्रिकेचा पॉल एडम्स यांच्यासारख्या गोलंदाजांना चायनामन म्हणून ओळखले जायचे.
आपण टाकत असलेल्या बॉलला चायनामन म्हटले जाते याची माहितीही कुलदीपला नव्हती.आशिया खंडातून श्रीलंकेचा लक्षण रंगिका हा पहिला चायनामन गोलंदाज होता. जुलै 2016 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले होते. आता कुलदीपनेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच पदार्पण केले हेदेखील विशेषच म्हणावे लागेल. 22 वर्षीय कुलदीप हा मूळचा उत्तरप्रदेशमधील कानपूरचा रहिवासी. अंडर 19 संघाकडून खेळलेला कुलदीप आयपीएलपासून चर्चेत आला होता. मुंबई इंडियन्सकडून खेळणार्या कुलदीपने नेटमधील सरावादरम्यान मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला त्रिफळाचित करत सर्वांनाच धक्का दिला होता. कुलदीपची चेंडू वळवण्याची शैली बघून तेंडुलकरलाही धक्का बसला होता.