चायना वस्तूंवर बहिष्कारासाठी जनजागृती

0

भुसावळ। कुरापतखोर चीनने भारतीय सीमेवर करीत असलेला उपद्रव आणि भारताकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन लक्षात घेता राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानांतर्गत स्वराज्य प्रतिष्ठानच्या सौजन्याने शहरात चीनी वस्तुच्या बहिष्काराबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना चीनी वस्तूंऐवजी भारतीय बनावटीच्या वस्तू वापरण्याचे आवाहन केले जात आहे.

भारतीय लघुद्योग डबघाईस
चीनला दरवर्षी देशातुन लाखो कोटी रुपयांचे चलन प्राप्त होत आहे. चीनी वस्तुंमुळे भारतीय छोटे उद्योग डबघाईला आले आहे. असे असून देखील चीन अप्रत्यक्षपणे भारतावर आक्रमण करण्याच्या वल्गना करत असतो. चीनला वठणीवर आणण्यासाठी चीनी वस्तुंचा बहिष्कार करणे आवश्यक आहे. आपल्याच पैशावर चीन युध्दसामुग्री उभी करून आपल्या विरूध्द वापरत आहे. त्यामुळे देशासाठी चीनी वस्तुंवर बहिष्कार टाकणे हि काळाची गरज आहे.

रिक्षांवर लावले फलक
यासाठी समाजात जागृती व्हावी म्हणून 18 रिक्षांवर व शहरातील सार्वजनिक ठिकाणी प्रबोधनात्मक बॅनर स्वराज्य प्रतिष्ठानच्या सौजन्याने नुकतेच लावण्यात आले आहे.त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. याप्रसंगी रितेश जैन, कृष्णा साळी, रोहित महाले, रानातला महादेव मंदिर व दिनदयाल नगर रिक्षा थांब्यावरील रिक्षाचालक उपस्थित होते.