जळगाव। विवेकानंद बहुउद्देशिय मंडळातर्फे शहरात ‘चायना वस्तुंना नाकारा’ या अभिनव आंदोलनाचा प्रचार सुरु आहे. याअंतर्गत आतापर्यंत घरोघरी 90 हजार पत्रकांचे वाटप घरोघरी व बाजारपेठेत तसेच कॉलनी परिसरात करण्यात आले आहे. या आंदोलनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळात असल्याचे आंदोलनाचे प्रमुख नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सांगितले. ‘चायना वस्तुंना नाकारा’ हे आंदोलन काय आहे ? याची माहिती असणारी ही पत्रके घरोघरी देण्यात येत आहे. गोलाणी मार्केटमधील व्यापारी संघटनेची एकत्र बैठक घेवून मेड ईन चायना वस्तू विक्रीसाठी आणू नका असे आवाहन त्यांनी केले आहे.
फुले मार्केट व्यापारी संघटनेसोबत बैठक
आता फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील व्यापारी संघटनेसोबत बैठक घेवून त्यांनाही मेड ईन चायना माल आणू नका असे आवाहन करु असे कैलास सोनवणे म्हणाले. ‘चायना वस्तू नाकारा’ या आंदोलनाच्या प्रचारासाठी उद्या, शुक्रवार, 21 जुलैपासून शहरातील प्रमुख चौक आणि महाविद्यालयांजवळ पथनाट्य सादर केले जाणार आहे. सकाळी नुतन मराठा महाविद्यालयात पथनाट्याचा पहिला प्रयोग सादर होईल. चीन- भारत संबंध, चीन कडून भारताला त्रास, सैनिकांची असुरक्षितता आदी विषय यात संवाद स्वरुपात आहेत. यात विनोद ढगे यांच्यासह सचिन महाजन, हाफीज खान, सोमनाथ शिंपी, बंडू दलाल, अमोल भालेराव, चंद्रकांत पाटील यांचा सहभाग असेल. संस्थेने सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.