पिंपरी-चिंचवड : निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या ‘संस्कृती संवर्धन व विकास महासंघ विभागा’च्या वतीने पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांसाठी अभिनव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आपल्या देशाप्रति प्रेम व्यक्त करता यावे, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात येणार असून, यंदाच्या गणेशोत्सवात चायनीज वस्तूंवरील बहिष्काराबाबत देखावे, प्रचार, जनजागृती, पथनाट्ये सादर करणार्या सार्वजनिक गणेश मंडळाला सावरकर मंडळातर्फे बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सावरकर मंडळाकडे 20 ऑगस्टपर्यंत गणेश मंडळांनी नोंदणी करणे गरजेचे आहे, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष विनोद बन्सल यांनी सांगितले.
चीनने व्यापली भारतीय बाजारपेठ
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना विनोद बन्सल म्हणाले, चायनीज मालाने भारतीय बाजारपेठ व्यापून टाकली आहे. त्याचे दुष्परिणाम आता प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. कमी दर्जाचा, कोणतीही गुणवत्ता व खात्री नसलेला तसेच पर्यावरणाला घातक माल कमी किमतीत आपल्याला विकला जात आहे. त्यामुळे भारतातील छोटे, मध्यम उद्योग बंद पडत आहेत. या पैशांतून चीन आपल्या देशाच्या अतिरेक्यांना मदत करीत आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी भारताची अर्थव्यवस्था, बाजारपेठ आणि उद्योग क्षेत्र भक्कम करणे गरजेचे आहे. त्यासाठी चायनीज वस्तूंवर बहिष्कार घालणे, हाच एकमेव पर्याय आहे.
प्रभावीपणे आवाहन करावे
प्रत्येक भारतीयाला याची जाणीव करून देण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी आपापल्या गणेश उत्सवात चायनीज वस्तूंवरील बहिष्काराबाबत प्रबोधनात्मक व्याख्याने, देखावे, पथनाट्ये, पत्रके, प्रचार फलक अशा विविध माध्यमातून प्रभावीपणे आवाहन करावे. उत्कृष्ट जनजागृती करणार्या गणेश मंडळाला सावरकर मंडळातर्फे बक्षीस देण्यात येणार आहे. चायनीज वस्तूंवरील बहिष्काराचे आवाहन गणेश मंडळांनी करावे, हा स्पर्धेचा मुख्य निकष आहे.
बक्षिसांचे स्वरूप असे
प्रथम क्रमांक मिळवणार्या गणेश मंडळाला 21 हजार एक रुपये, द्वितीय क्रमांक मिळवणार्या गणेश मंडळाला 15 हजार रुपये, तृतीय क्रमांक मिळवणार्या गणेश मंडळाला 11 हजार रुपये तर उत्तेजनार्थ म्हणून पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी 20 ऑगस्टपूर्वी प्रवेश अर्ज भरणे आवश्यक आहे. स्पर्धेची नियमावली निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या कार्यालयात उपलब्ध आहे. अधिकाधिक गणेश मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होऊन चायनीज मालाचा बहिष्कार व स्वदेशीचा स्वीकार, या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन सावरकर मंडळाने केले आहे.