चाय पे चर्चा! न्यायमूर्तींतील वाद मिटला!

0

नवी दिल्ली : चार वरिष्ठ न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टातील सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कारभाराविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर उद्भवलेला वाद अखेर मिटला. सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश मदन लोकूर, न्यायाधीश कुरियन जोसेफ, न्यायाधीश रंजन गोगोई हे सर्वोच्च न्यायालयात न्यायदान करण्यासाठी आले होते. तर सरन्यायाधीश दीपक मिश्रा हे सुद्धा सोमवारी न्यायालयात आले होते.

एकत्र चहा घेत चर्चा
शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयातील चार वरिष्ठ न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांच्या कारभाराविरोधात पत्रकार परिषदे घेऊन आवाज उठवला होता. सरन्यायाधीश हे काही प्रकरणे वरिष्ठांऐवजी कनिष्ठ न्यायाधीशांकडे देतात, असा आरोप त्यांनी केला होता. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेण्याची ही इतिहासातील पहिलीच घटना होती. त्यामुळे देशभरात त्याचे पडसाद उमटत होते. परंतु, सोमवारी या वादावर पडदा पडला. सोमवारी हे चारही न्यायाधीश कामावर परतले. सकाळी न्यायाधीशांनी एकत्र चहा घेत एकमेकांशी चर्चा केली, असेही सूत्रांनी सांगितले.

केंद्र सरकारची शेवटपर्यंत चुप्पी
याप्रकरणात केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपने प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. हे प्रकरण न्यायपालिकेतील अंतर्गत असल्याने यावर भाष्य करणे योग्य नाही असे सांगून दूर राहणेच पसंत केले होते. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन आपले मत मांडले होते. तसेच संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूचा निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी केली होती.