चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

0

जळगाव । जळगाव-औरंगाबाद राज्य महामार्गावर अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीस्वारास धडक देत पळ काढला. या अपघातात डोक्यात हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यु झाल्याची घटना रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली.

यावेळी तरूणाच्या खिशातून निघालेल्या चिठ्ठीतून तरूणाची ओळख पटली असून गजानन राजेंद्र सोनार असे मयत तरूणाचे नाव आहे. जळगाव-औरंगाबाद राज्य महामार्गावर औद्योगीक वसाहत कडून अजिंठा चौकाकडे येत असतांना सुसाट चारचाकी वाहन धारकाने बजाज बॉक्सर क्र (एमएच.19.एन.9443) वरील गजानन राजेंद्र सोनार (वय-24,रा.खेडी बुद्रूक) या दुचाकीस्वारास धडक देत पळ काढला. घराकडे परतीच्या मार्गावर असलेल्या नोकरदार वाहनधारकांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेत पोलिसांना घटना कळवली

पोलिसांची घटनास्थळी धाव
दुचाकीला धडक दिल्यावर पांढर्‍यारंगाची चारचाकी वाहन औरंगाबादच्या दिशेने सुसाट वेगात निघुन गेले. औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्याचे अधिकारी कर्मचार्‍यांनी घटनास्थळावर धाव घेत जखमीला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलवले.पळून गेलेल्या वाहन धारकाचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. जिल्हारुग्णालयात दाखल केलेल्या जखमीचा उपचारापुर्वीच मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी कळवल्यावर त्याची ओळख पटवण्यात आली. पवन मोरे खुबचंद साहित्यानगर यांच्या तक्रारीवरुन अज्ञात वाहनधारका विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन तपास सहाय्यक फौजदार राजाराम पाटील करीत आहे.

चिठ्ठीवरुन पटली ओळख
जखमी तरुण दुचाकीवर एकटाच होता, त्याची ओळख पटवणे गरजेचे असल्याने पोलिसांनी प्रेताची अंगझडती घेतल्यावर खिश्यातून निघालेल्या चिठ्ठीत मोबाईलनंबर आढळून आल्याने निरीक्षक सुनील कुराडेंसह पथकाने त्याच्या कुटूंबीयांचा शोध घेत अपघाताची माहिती कळवली रात्रीतून नातेवाईक कुटूबीयांनी जिल्हारुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, गजानन हा वेल्डींगचे काम करायचा. त्याच्या पश्‍चात घरात आई-वडील,एक बहिण व एक लहान भाऊ असा परिवार आहे.