चारचाकी-दुचाकीचा अपघात, मामा-भाचा ठार

0

सावतर निंभोर्‍यात शोककळा ; वरणगाव पोलिसात गुन्हा

वरणगाव– राष्ट्रीय महामार्गावरील जाडगाव फाट्याजवळील कुशल धाब्यासमोर भरधाव वेगातील चारचाकीने दुचाकीला समोरून धडक दिल्याने सावतर निंभोरा येथील मामा-भाच्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातानंतर सावतर निंभोर्‍यात शोककळा पसरली. वरणगाव पोलिसात या प्रकरणी शून्य क्रमांकाने गुन्ह्याची नोंद वर्ग करण्यात आली.

भरधाव चारचाकी दुचाकीवर धडकली
इंडिका क्रमांक (एम.एच. 05 ए.बी.2240) वरील चालक प्रवीण हरी सोनवणे (कावठी, जि.धुळे) हे महामार्गाने जात असताना बाळू कोळी हे त्यांचे भाचे किशोर कोळी यांच्यासोबत दुचाकी (एम.एच. 19-6530) ने वरणगावकडे येत असताना दोन्ही वाहनांची समोरा-समोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील बाळू राजाराम कोळी (45, मूळ रा.चोरवड, ह.मु.सावतर-निंभोरा) यांच्यासह त्यांचा भाचा किशोर रघुनाथ कोळी (30, सावतर-निंभोरा) दोन्ही गंभीर जखमी झाले. दोघांनाही अपघात स्थळावरुन तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवत असताना दोघांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्हा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्यानंतर ती शून्य क्रमांकाने वरणगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली.