चारशे वर्षांची परंपरा : वराडसीमच्या ऐतिहासीक पोळ्याने फेडले डोळ्यांचे पारणे

Four Hundred Years of Tradition : A Blink of an Eye Paid by Varadsim’s Hive भुसावळ : सुमारे चारशे वर्षांपासून अधिक परंपरा असलेल्या वराडसीम येथील पोळा सणासाठी पंचक्रोशीतील शेतकरी शुक्रवारी गावात जमले होते. सुमारे अडीच वर्षांनंतर कोरोना संकट ओसरल्याने यंदाच्या उत्सवासाठी विशेष आकर्षण होते. गेल्या तीन वर्षांचे रेकॉर्ड कायम रोखत जोगलखोरी येथील गजानन पाटील यांच्या बैलाने पोळा फोडण्याचा यंदाही मान मिळवला. पोलिसांच्या बंदोबस्तात पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

उत्सवाला चारशे वर्षांची परंपरा
वराडसीम येथील पोळ्याला सुमारे चारशे वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा आहे. पोळा सणाला गावासह पंचक्रोशीत विशेष महत्व असून गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे सण उत्साहात साजरा करता येत नसलातरी यंदा मात्र कोरोना ओसरल्याने विशेष उत्साह शेतकर्‍यांसह गावकर्‍यांमध्ये होता. पोळा सणाल गाव दरवाजाच्या खिडकीतून बैल कुदविण्याची परंपरा असून यंदादेखील जोगलखोरी येथील गजानन पाटील यांच्या बैलाने सलग चौथ्या वर्षी पोळा फोडण्याचा मान मिळवला. तत्पूर्वी शेतकरी सुनील पाटील यांचा मानाच्या बैलाला बाशिंग बांधून वाजत-गाजत गावातील शिवावरून फिरून आणल्यावर गावातील मुख्य दरवाजा बंद करण्यात आला. यानंतर गाव दरवाजा बंद करून गाव दरवाजाच्या खिडकीतून बैलासह मालकाची उडी मारण्याची शर्यत सुरू करण्यात आली.

पोलिसांचा काटेकोर बंदोबस्त
भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे, सहायक निरीक्षक अमोल पवार यांच्यासह दहा पोलिस, होमगार्ड यांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला. दरम्यान, गजानन पाटील यांचा बैलाने प्रथम येण्याचा मान मिळविल्याने ग्रामपंचायतीतर्फे सरपंच भारती पचेरवाल, उपसरपंच ज्योत्स्ना पाटील यांनी शाल, श्रीफळ देऊन पाटील यांचा सत्कार केला.