फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचे व दुष्काळाचे चटके बसू लागले
चिंबळी : चार्यासाठी वणवण भटकताना भुकेनं व्याकुळलेल्या बकर्यांकडे बघून पोटातली आतडी तुटायला व्हतं… आमच्या बकर्याचं कुणाला काई नाय… आमचं हाल आम्हालाच ठाऊक… काळीज पोखरावी अशी, ही बोलकी प्रतिक्रिया आहे केळगांव, मरकळ, चिंबळी, कुरूळी परिसरात भटकणार्या मेंढपाळांची!
चार दिवस इथं तर, चार दिवस…
सध्या या भागात चाराटंचाई जाणवत असून डोंगरावरील गवत मोठ्या प्रमाणात जाळल्याने मेंढरांची चार्यासाठी या शिवारातून त्या शेती शिवारात वणवण होत असून मुबलक चारा ही उपलब्ध होत नाहीये. मोकळ्या रानात पाल ठोकून वाडा बसवायचा. उघड्यावरच तीन दगडांची चूल मांडायची. चार दिवस इथं तर, चार दिवस दुसर्या रानात… ही भटकंती मेंढपाळांच्या जणू पाचवीलाच पुजलेली असते. पोरं, कोंबड्या, कुत्री, बकर्यांचा बोजबारा घेऊन त्यांची भटकंती सुरूच असते. सध्या मात्र मैलोन मैलाचा मुलूख पालथा घालूनही त्यांच्या मेंढरांना पोटभर चारा मिळेना.
डोंगरावरील गवताला वनव्याने आग
मरकळ परिसर गोलेगाव, धानोरे, केळगाव, चिंबळी, सोळू आदी गावांमध्ये मेंढपाळ पाल टाकून राहत असून दिवसभर परिसरातील शेती शिवारात भटकंती करताना दिसून येत आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने चार्याची चिंता मिटली होती. परंतु हिरवा चारा राहिला नसल्याने मेंढरांची डोंगरमाळा वाळलेल्या गवतावरच भिस्त होती. परंतु त्याही डोंगरावरील गवताला वनव्याने आग लागल्याने ऐन हिवाळ्यात मेंढपाळांना शेती शिवारातील पिकांच्या पाल्यावर दिवस काढावे लागत आहे. अजून सहा-सात महिने हीच परस्थिती राहणार असल्याने मेंढपाळ चिंतेत पडला आहे.
शिवार फेरी करावी लागते
यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचे व दुष्काळाचे चटके बसू लागले आहे. दरवर्षी प्रमाणे पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये नगर जिल्हातील ढवळपुरी, अळकुटी आदी परिसरातील मेंढापाळ चिंबळी, मोई, कुरूळी, निघोजे, मोशी, केळगाव, सोळू, धानोरे, गोलेगाव, मरकळ भागात गेल्या एक ते दीड महिन्यापूर्वी दाखल झाले आहेत. परंतु मेंढापाळांना पाणी व चारा सोधण्यासाठी या गावातून दुसर्या गावात शिवार फेरी करत जावे लागत आहे. यावर्षी सर्वत्र पाऊस पडून देखील फेब्रुवारी महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. शेतकर्यांनी रब्बी हंगामातील कांदा, ज्वारी, गव्हू व पालेभाज्या व फुलशेती रिकामी केली असल्याने थोडाफार हिरवा चारा व झाडपाला शेळ्या-मेंढाना मिळत आहे. पंरतु इंद्रायणी नदीचे पाणी जलपर्णीने पूर्णपणे दूषित झाले असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई मात्र मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे.