रांची : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना रांची सीबीआय न्यायालयाने शनिवारी चारा घोटाळाप्रकरणी साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच 5 लाख रूपयांचा दंडही ठोठावला आहे. 30 डिसेंबरच्या सुनावणीत त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. तब्बल 21 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला. विशेष न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी निकाल जाहीर केल्यानंतर लगेचच 69 वर्षीय लालूप्रसाद यांना अटक करण्यात आली होती. यानंतर लालूंच्या शिक्षेची सुनावणी तीनवेळा टळली होती. यादव यांना जामीन मिळणार नाही असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील इतर दोषी फूलचंद, महेश प्रसाद, बेक जूलियस, सुनील कुमार, सुशील कुमार, सुधीर कुमार आणि राजाराम यांनाही साडेतीन वर्षांचा कारावास आणि 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
शंभर रूपयांची तरतूद असताना 40 लाख काढले
शुक्रवारी न्यायालयात आरोपींच्या वकिलांनी न्यायाधीशांसमक्ष कमीत कमी शिक्षा देण्याची विनंती केली होती. तर सीबीआयच्या वकिलांनी आरोपींना सात वर्षे शिक्षा ठोठावण्याची मागणी केली होती. यामुळे सरकारी खजिना लुटणार्यांना कठोर शिक्षा दिली जाते, असा संदेश जनतेत जाईल, असे म्हटले होते. या आरोपींनी बेदरकारपणे सरकारी तिजोरीची लूट केली आहे. जर 100 रुपयांची तरतूद असेल तर हे आरोपी 40 ते 50 लाख रुपये काढत होते. गुन्ह्याच्या पद्धती व गांभीर्य लक्षात घेता यांना दया दाखवण्याची गरज नाही, असे सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. तर आरोपीच्या वकिलांनी आपले अशील आजारी असल्याचे सांगत कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी विनंती न्यायालयास केली होती.
असे आहे देवघर प्रकरण
बिहार सरकारने 1991 ते 1994 दरम्यान जनावरांच्या औषधी व चारा विकत घेण्यासाठी 4 लाख 7 हजार रुपयांची तरतूद केली होती. परंतु देवघर येथील कोशागारातून 6 बनावट वाटप पत्रांद्वारे 89 लाख 413 रुपये काढण्यात आले होते.
लालूंसाठी न्यायाधीशांना फोन
सीबीआयचे विशेष न्यायाधीश शिवपालसिंह यांनी गुरुवारी सुनावणीदरम्यान लालूंना उद्देशून म्हणाले, तुमच्या शुभचिंतकांचे अनेक फोन मला आले होते. पण मी कोणाचे ऐकत नसतो. यावर राजदचे उपाध्यक्ष शिवानंद यांनी शुक्रवारी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, न्यायाधीशांना राजदच्या कोणत्याही नेत्याने फोन केलेला नाही. जर कोणी फोन केला असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी. न्यायाधीशांनी नावाचा उल्लेख करायला हवा होता ते न्यायाधीश आहेत, महामानव नव्हे, अशीही टिप्पणी तिवारी यांनी केली होती.
हायकोर्टात जाणारच : तेजस्वी यादव
न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना जामीन मिळणार नाही असेही स्पष्ट केले. मात्र लालूप्रसाद यादव यांचा मुलगा आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मी हार मानणार नाही. उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आणि जामीन मिळवणारच असे म्हटले आहे. लालप्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतरच राजदची धुरा कोण सांभळणार? राजदचे काय होणार? या प्रश्नांवर चर्चा होत होती. मात्र तेजस्वी यादवच सगळी जबाबदारी पार पाडतील असे आता स्पष्ट होताना दिसते आहे. राजदमध्ये आता फूट पडू शकते असेही अंदाज वर्तवले जात आहेत मात्र तेजस्वी यादव यांनी हे अंदाज चुकीचे ठरतील असे म्हटले आहे.
चारा आणि लालू
6 खटले लालूंविरूद्ध सुरू
55 एकूण खटले सध्या सुरू
33 व्या खटल्यात शिक्षा