आळंदीमधील मेंढपाळांनी केल्या व्यक्त भावना
चिंबळी : अनशापोटी चार्यासाठी वणवण भटकताना भुकेनं व्याकुळलेल्या बकर्यांकडं बघून पोटातली आतडी तुटायला व्हतं…आमच्या बकर्याचं कुणाला काई नाय..आमचं हाल आम्हालाच ठाऊक…बकर्यांना जीवंत ठेवण्यासाठी आम्हाला गावोगाव फिरावे लागते. काळीज पोखरावी अशी, ही प्रतिक्रिया आहे आळंदी परिसरात भटकणार्या मेंढपाळांची. सध्या या भागात चारा टंचाई जाणवत असून डोंगरावरील गवत पावसा अभावी जळून गेल्याने मेंढरांची चार्यासाठी या शिवारातून त्या शेती शिवारात वणवण होत आहे. मुबलक चारा ही उपलब्ध होत नाहीये. मोकळ्या रानात पाल ठोकून वाडा बसवायचा. उघड्यावरच तीन दगडांची चूल मांडायची. चार दिवस इथं तर, चार दिवस दुसर्या रानात…ही भटकंती मेंढपाळांच्या जणू पाचवीलाच पुजलेली असते. पोरं, कोंबड्या, कुत्री, बकर्यांचा बोजबारा घेऊन त्यांची भटकंती सुरूच असते. सध्या मात्र मैलोन् मैलाचा मुलूख पालथा घालूनही त्यांच्या मेंढरांना पोटभर चारा मिळेना.
हे देखील वाचा
पावसाअभावी चार्याची चिंता वाढली
आळंदी परिसरातील गोलेगाव, धानोरे, केळगाव, चिंबळी, सोळू, मरकळ आदी गावांमध्ये मेंढपाळ पाल टाकून राहत आहेत. दिवसभर परिसरातील शेती-शिवारात भटकंती करताना ते दिसून येत आहेत. यंदा पावसाने पाठ फिरविल्याने चार्याची चिंता वाढली आहे. हिरवा चारा राहिला नसल्याने मेंढरांची डोंगरमाळांवरील वाळलेल्या गवतावरच भिस्त होती. परंतु त्याही डोंगरावरील गवत सुकले आहे. त्यामुळे मेंढपाळांना शेती-शिवारातील पिकांच्या पाल्यावर दिवस काढावे लागत आहेत. अजून नऊ महिने तरी हीच परस्थिती राहणार असल्याने मेंढपाळ चिंतेत पडला आहे. दरवर्षी चिंबळी परिसरातील अनेक गावांमध्ये नगर जिल्हातील ढवळपुरी, अळकुटी आदी परिसरातील मेंढपाळ रहाण्यास येतात. मेंढापाळांना पाणी व चारा सोधण्यासाठी या गावातून दुसर्या गावात शिवार शोधत जावे लागते आहे. यावर्षी सर्वत्र पाऊस पडून देखील तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. इंद्रायणी नदीचे पाणी जलपर्णीने पुर्णपणे दुषित झाले असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे.