चारित्र्याच्या संशयावरुन पत्नी व मुलीची हत्या !

0

पुणे : चारित्र्याच्या संशयावरुन पतीने आपली पत्नी व अडीच वर्षांच्या मुलीची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार ताडीवाला रोड येथे आज पहाटे ५ वाजता घडला. तबस्सुम शेख आणि मुलगी अलिना शेख असे पत्नी व अडीच वर्षाच्या मुलीचे नाव आहे. त्यानंतर पतीने स्वत:वरही वार करुन घेतले असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. आयाज शेख (३०) असे त्याचे नाव आहे.

आयाज शेख हा एका खाद्यपदार्थाच्या दुकानात कामाला आहे. त्याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यातून त्यांची नेहमी भांडणे होत होती. त्यांनी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्जही केला होता. त्याची सुनावणी पूर्ण झाली होती. येत्या महिन्याभरात त्यावर निकालही लागणार होता. तबस्सुम या ताडीवाला रोडवरील बुद्ध विहाराजवळील वडिलांच्या घरी मुलीसह रहात होती. आज मंगळवारी पहाटे आयाज तेथे आला. त्यांच्यात पुन्हा भांडणे झाली. त्यावेळी रागाच्या भरात आयाज शेख याने पत्नीला चाकूने वार करुन तिची हत्या केली. तिच्या पाठोपाठ अडीच वर्षाच्या अलिना हिच्यावरही वार करुन तिला मारले. त्यानंतर त्याच चाकूने त्याने स्वत:च्या पोटावर वार करुन घेतले.

घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एम. मुजावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आयाज याला ससुन रुग्णालयात दाखल केले असून हत्येसाठी वापलेला चाकू जप्त केला आहे.