प्रियकर फरार : आत्महत्या करण्याची चिठ्ठी लिहून ठेवली
पुणे : चारित्र्याच्या संशयावरून महाविद्यालयीन तरुणीची प्रियकरानेच हत्या केल्याची घटना रविवारी नऱ्हे भागात उघड झाली. हत्या केल्यानंतर
आरोपीने चिठ्ठी लिहून ठेवली असून आत्महत्या करणार असल्याचे त्यात नमूद केले आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनाली आनंदराव भिंगारदिवे (वय 23, मूळ रा. विजयनगर, कराड) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. सोनाली येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. सोनाली मंगळवारपासून (दि.19) बेपत्ता असल्याची तक्रार पालकांनी पोलिसांकडे केली होती. याप्रकरणी पोलीस संशयित आरोपी सोमेश घोडकेचा शोध घेत आहेत. सोमेश आणि सोनाली यांच्यात प्रेमसंबंध होते. एक रूम भाड्याने घेऊन ते एकत्र राहत होते. विशेष म्हणजे, रूम घेताना दोघांनीही घरमालकाला त्यांचे लग्न झाल्याचे सांगितले होते.
दरम्यान, सोमेश हा सोनालीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरून त्यांच्यात सतत भांडणेही होत असत. यातूनच मंगळवारी (दि.19) त्याने सोनालीचा गळा चिरुन हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. यानंतर आरोपी घराला बाहेरुन कडी लावून फरार झाला. घराच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंध आल्याने त्यांनी घरमालाकाला कळविले. त्यावेळी घर उघडून पाहिले असता सोनाली मृत अवस्थेत आढळून आली. त्यांनी पोलिसांशी संपर्क केला, त्यानंतर हा प्रकार समोर आला.