चार्जिंग सुरू असणार्‍या मोबाईलवर बोलणे जीवावर बेतले

0

मुंबई : वांद्रे येथे काम करणारा तपन गोस्वामी 15 दिवसांपूर्वीच मुंबईत आला होता. वांद्रे पश्चिमेतील शास्त्रीनगर येथे दोन मित्रांसह तो भाड्याच्या खोलीत राहत होता. तपन हा मूळचा पश्चिम बंगालचा होता. मंगळवारी संध्याकाळी तपनचा मित्र संजय त्याची भेट घेण्यासाठी आला. काही वेळाने संजय घरातून ओरडत बाहेर आला. यानंतर अन्य रहिवाशांनी खोलीत धाव घेतली असता तपन जमिनीवर पडल्याचे दिसले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. तपनला रुग्णालयात दाखलही करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. शॉक लागल्याने तपनचा मृत्यू झाला.

स्विचबोर्डात पाणी गेल्याने शॉक
खोलीतील स्विचबोर्डमध्ये पावसाचे पाणी गेले असावे आणि याचदरम्यान तपनने मोबाईल चार्जिंगला लावला असेल. मोबाईल चार्जिंगला असतानाच त्याने कॉल रिसिव्ह केला आणि शॉक लागून त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासातही हीच बाब समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मोबाईल चार्जिंग सुरु असताना कॉल रिसिव्ह करू नका, असा सावध इशारा अनेकदा दिला जातो. पण त्याकडे तरुण अनेकदा दुर्लक्ष करतात. हाच दुर्लक्षितपणा तुमच्या जीवावरही बेतू शकतो, हे या उदाहरणावरून स्पष्ट झाले.

बॅटरी नव्हे छोटा बॉम्बच
दरम्यान हल्ली बाजारात विविध कंपन्यांचे मोबाईल आलेले आहेत. याच चीनी कंपन्यांचेही पार्ट वापरले जातात. बहुतांश कंपन्या निकृष्ट दर्जाची बॅटरी वापरत असतात. त्यामुळे मोबाईलच्या बॅटर्‍या ह्या अनेकचा छोटा बॉम्ब आहेत की काय, असे या अपघातांवरून दिसून येते. बर्‍याचदा चार्जींग सुरू असतांना बॅटरीचा स्फोट होऊन आग लागणे, तोंडावळा जळून जाणे, हाताच्या चिंधड्या होणे असे अपघात घडले आहेत. त्यामुळे हे मोबाईल बाळगणे धोकादायक बनले आहे.