जनशक्ति चमुकडून । साक्री तालुक्यातील धाडणे गावालगत आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास साक्रीकडून पिंपळनेरकडे जाणार्या पिकअप व्हॅनने समोरून येणार्या अॅपे रिक्षाला धडक दिली. अॅपे रिक्षेच्या पाठीमागून येणार्या मोटारसायकललाही रिक्षेसह व्हॅनची धडक बसल्याने या अपघातात 4 ठार तर 6 जण जखमी झाले आहेत. तळवेल फाट्याजवळील साई मंदिराजवळ मोटारसायकलला क्रुझर गाडीने भरधाव वेगात धडक दिल्याने मोटरसायकवरील एक जण ठार झाला. तिसर्या अपघातात मुंबई-आग्रा महामार्गावरील कलमाडी फाट्यावर मंगळवारी सकाळी ट्रकचा टायर फूटल्याने अनियंत्रित झालेल्या ट्रकवर दुसरा ट्रक आदळल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून अन्य तिघे जखमी झाले आहेत.
जखमी धुळ्याच्या रुग्णालयात
साक्री ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून काही जखमींना धुळे येथे रवाना करण्यात आले आहे. सयाजी कैलास पवार (वय 47, रा.धाडणे)े, वंदना रतन बोरसे (वय 35, रा.धाडणे)े, उत्तम मन्साराम बोरसे (वय 45, धाडणे)े, जीभाऊ मालजी पवार (वय 40, रा.धाडणे), जंगलु रामजी मालजी पवार (वय 40, रा.धाडणे ), अविनाश भटू भदाणे (वय 32, धाडणे)े हे जखमी झाले आहेत. पिकअप 407 साक्रीकडून पिंपळनेरकडे जात असतांना पिंपळनेरकडून येणार्या अॅपेरिक्षा (क्रमांक एमएच 18 डब्ल्यू 1936)ला धडक दिली नंतर पाठीमागून येणार्या दुचाकीस्वारालाही पिकअपव्हॅनने धडक दिली त्यात दुचाकीची पेट्रोल टाकी फुटल्याने या गाड्यांना आग लागली. पिकअप व मोटरसायकल जळून खाक झाली. घटनास्थळी डी.वाय.एस.पी निलेश सोनवणे यांनी भेट दिली. साक्रीचे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील व कर्मचार्यांनी आग विझविली.
विवाह सोहळ्याला गालबोट
धुळे । मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात सहा जागीच ठार तर 10 जण जखमी झाले आहेत. गुरुद्वाराजवळ डंपर व सुमोच्या भीषण अपघात झाल्याची घटना घडली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे काही वेळ महामार्गावर रहदारी ठप्प झाली होती. गुरुव्दाराजवळ नवकार हिल्स् येथे उड्डाणपुलाकडे जाणार्या सुमोला डंपरने धडक दिली. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. फिरदौस नगरातील विवाह सोहळा आटोपल्यावर मुस्लिम समुदायातील हे नातेवाईक शहरात फिरायला निघाले होते. डंपरचा क्रमांक एच.एच.14-ए-एस-8265 आणि सुमोचा क्रमांक एम.एच.-19-क्यू-9689 असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ट्रकचे टायर फुटल्याने अपघात
नरडाणा । मुंबई-आग्रा महामार्गावरील कलमाडी फाट्यावर मंगळवारी सकाळी ट्रकचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार व अन्य तिघे जखमी झाले . अपघातानंतर जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मंगळवारी पहाटे एम.पी.09/आयजी-5999 क्रमांकाचा ट्रक पपई घेवून सेंधव्याहून धुळ्याकडे येत असताना कलमाडी फाट्यावर या ट्रकचे टायर फूटले. त्यामुळे चालकाचा ताबा सुटून ट्रक अनियंत्रित झाला. त्याचवेळी द्राक्ष घेऊन येणारा युपी 14/एटी-5050 क्रमांकाचा दुसरा ट्रक त्यावर आदळला. या अपघातात मोहम्मद अक्रम हा जागीच ठार झाला तर मो.इब्राहिम मो.इसासह अन्य दोघे जखमी झाले. जखमींना धुळे येथे नेले. त्यामुळे त्यांची नावे कळू शकली नाहीत. पोलिसांनी मृत मो.अक्रम याचे पार्थिव नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले.
वरणगावाजवळ अपघातात एक ठार
वरणगाव। येथून जवळच तळवेल फाट्यावर साई मंदिराजवळ मोटारसायकलला भरधाव क्रुझर गाडीने धडक दिल्याने मोटरसायकस्वार ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. मोटारसायकल (क्र- एमएच 19 यू 7357 )स्वार विकास शरद सुरवाडे (वय 35) व विशाल अरुण भारसके (वय 29, दोघे रा- तळवेल) हे वरणगावकडून तळवेलला जात असतांना समोरुन भरधाव येणार्या क्रुझरने मोटारसायकलला धडक दिली. विकास सुरवाडे व विशाल भारसके यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेताना विकास सुरवाडे यांचा मृत्यू झाला.