चार कोटींच्या खर्चास ‘स्थायी’ची मंजुरी

0

पिंपरी-चिंचवड : शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणार्‍या चार कोटी 68 लाख 52 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या शाळेत शिकणार्‍या इयत्ता दहावीतील 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांबरोबरच अंध व अपंग बारा विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी येणार्‍या 33 लाख 75 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

दिघीत नवीन पाण्याची टाकी
दिघी येथे नवीन पाण्याची टाकी बांधण्यासाठी येणार्‍या सुमारे एक कोटी 66 लाख 93 हजार रुपयांच्या खर्चासह ‘इ’ प्रभागातील भोसरी, इंद्रायणीनगर, पांजरपोळ टाक्यांवरून पाणीपुरवठा करण्यासाठी मजूर पुरविण्यासाठी येणार्‍या 27 लाख 16 हजार रुपयांच्या खर्चासदेखील या बैठकीत मान्यता देण्यात आली. ’इ’ प्रभागातील मोशी, चर्‍होली दिघी टाक्यांवरून पाणीपुरवठा करण्यासाठी मजूर पुरविण्यासाठी येणार्‍या 41 लाख रुपयांचा खर्च, वाय.सी.एम. रुग्णालयामध्ये कार्यान्वित असलेल्या हेल्थ कार्ड मॅनेजमेंट सिस्टीमच्या कामकाजासाठी 29 लाख 99 हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन
महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयांचा मार्च 2017 चा निकाल 82.21 टक्के लागला असून, इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले सात विद्यार्थी आहेत. त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे. तसेच 85 ते 89.99 टक्के गुण प्राप्त केलेल्या 20 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये व 80 ते 84.99 टक्के गुण प्राप्त केलेल्या 43 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच अंध व अपंग उत्तीर्ण 12 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये; याप्रमाणे एकूण 82 विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर 33 लाख 75 हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.