भूसावळ लोहमार्ग पोलिसांची दमदार कामगिरी : चारही गुन्ह्यातील निम्म्याहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात यंत्रणेला यश
भुसावळ :शहरातील लोहमार्ग पोलिसांनी चार वेगवेगळ्या दाखल घटनेतील सहा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. रेल्वे पोलिस पथकाने ही कारवाई लोहमार्ग पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे व लोहमार्ग पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. दरम्यान, अटकेतील सहा आरोपींना भुसावळ न्यायालयात हजर केले असता दोघांना पोलिस तर चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलिस कोठडीत आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
चाकूच्या धाकावर लूट ः दोघे जाळ्यात
चौथ्या घटनेत अजय बंडु अत्राम (19, रा.बाभुळगाव, यवतमाळ) व त्याचे सोबत रामदेव सुरेश निसाळ (19, रा. नवागड, छत्तीसगड) हे दोघे गुरूवारी, 28 रोजी अप आझाद हिंद हावडा एक्स्प्रेसने पुण्यासाठी जनरल डब्यातून प्रवास करीत असताना भुसावळ-जळगाव दरम्यान तीन चोरट्यांनी या दोघांना चाकूचा धाक दाखवून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत रोख रक्कम दोन हजार 500 रुपये व सहा हजार 270 रुपयांचा मोबाईल लांबवल्याने गुन्हा दाखल होता. या चोरीच्या तपासात रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी शहारुक कलीम खान (20) व अजहर खान अय्युब खान (22, दोन्ही रा. सावदा) या दोघांना अटक करुन रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले तर या घटनेतील मुख्य संशयीत गुलाबशहा उर्फ राजु (22, रा.सावदा) हा सावदा येथे त्याची घरी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन जीआरपीच्या डीबी पथकाने सावद्यात जाऊन संशयीताच्या मुसक्या आवळल्यात. चोरलेला मोबाईल पोलिसांनी जप्त केला. सहायक पोलिस निरीक्षक पौर्णिमा राखुंडे व सुनील इंगळे पुढील तपास करीत आहे. याप्रकरणी संशयीतांकडून अजूनही काही गुन्ह्यांमध्ये मुद्देमाल मिळतो का याकडे लक्ष लागले आहे. याप्रकरणी शनिवारी संशयीतांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने अजहर खान अय्युब खान व गुलाबशहा उर्फ राजू यांना पोलिस कोठडी सुनावली तर बलराम नन्नुभील ठाकुर (रा. तीन पुलिया, खंडवा म.प्र),स्वप्नील देविदास पाटील (वय 27, रा. किरंगेवाडा, सुभाष चौक फैजपूर, ता. यावल), शे. निसार शे. वजीर उर्फ बाबन्या (रा. गौसियानगर, भुसावळ) यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
मोबाईल चोरही जाळ्यात
तिसर्या चोरीच्या प्रकरणात जय रामचरण पटेल (रा, भाईंदर, मुंबई) हे शुक्रवार, 29 रोजी रोजी गाडी क्रमांक 12167 डाऊन एलटीटी-मंडुवाडी एक्स्प्रेसच्या बी- 2 मधील बर्थ 10 वरून प्रवास करीत असतांना जळगाव ते भुसावळ दरम्यान त्यांचा नऊ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेला. गुन्हा दाखल झाल्यावर काही वेळातच रेल्वे आऊटरवर संशयास्पदरीत्या फिरणार्या बलराम नन्नुभील ठाकुर (रा.तीन पुलिया, खंडवा म.प्र) यास ताब्यात घेताच त्याने गुन्ह्याची कबुली देत या चोरीतील मोबाईल पोलिसांना काढून दिला. त्यास अटक करण्यात आली असून तपास फौजदार अनिल केरुरकर करीत आहे.
अप कर्नाटकमधील चोरीचा उलगडा
अप कर्नाटक एक्सप्रेस मधील जनरल डब्यातून 8 नोव्हेंबर रोजी नंदकिशोर मोतीराम धरम (63, रा. इंदौर, म.प्र) हे प्रवास करीत असतांना गाडीने भुसावळ सोडल्यानंतर संशयीताने सहा हजार 500 रुपये रोख चोरले होते. त्यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला होता. या घटनेत शुक्रवार, 29 रोजी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तीनवर अप नवजीवन एक्सप्रेस आली असता हिरालाल जाधव यांना संशयास्पदरीत्या एक व्यक्ती फिरतांना दिसला त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव शे.निसार शे.वजीर उर्फ बाबन्या (रा.गौसीयानगर, भुसावळ) असे सांगून चौकशीत त्याने गुन्ह्याची कनार्टक एक्सप्रेसमधील चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यातील दोन हजार रुपये हस्तगत करण्यात आले. तपास हिरालाल जाधव करीत आहे.दरम्यान, आरोपीला शनिवारी न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.
पठाणकोटमधील लेडीज पर्स चोरीचा उलगडा
अप पठाणकोठ एक्सप्रेसच्या महिला डब्यातून प्रवास करणार्या सविता संजय तारुक (रा.सावतर निंभोरा, ता.भुसावळ) यांची 25 ऑक्टोबर रोजी चोरट्यांनी पर्स लांबवली होती. त्यात एक हजार 800 रुपयांच्या रोकडसह कागदपत्रे होती. शुक्रवार, 29 रोजी सायंकाळी पाचला प्लॅटफॉर्म तीनवर संशयास्पदरीत्या फिरणार्या स्वप्नील देविदास पाटील (27, रा. किरंगेवाडा, सुभाष चौक फैजपूर, ता.यावल) ताब्यात घेतल्यानंतर त्याने चोरीची कबुली देत 500 रुपये काढून दिले. त्यास शनिवारी न्यायालयाने त्यास कोठडी सुनावली. तपास दिनकर कोळी करीत आहे.