चार चोरट्यांकडून 15 लाखांचा ऐवज जप्त

0

एमआयडीसी भोसरी पोलिसांची कारवाई

पिंपरी : टेम्पो आणि ट्रकची चोरी करून त्याची विक्री करणार्‍या दोन सराईत आणि अन्य दोन चोरट्यांना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एकूण 14 लाख 75 हजार 575 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सचिन धनराज पवार (वय 25, रा. मोशी) आणि अक्षय उर्फ बंटी दत्तू कांबळे (वय 21, रा. मोशी) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत चोरट्यांनी नावे आहेत.

सापळा रचून घेतले ताब्यात
पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या रमजानचा महिना सुरु आहे. त्यामुळे एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी गस्त घालत असताना सराईत चोर सचिन आपल्या एका साथीदारासह आदर्शनगर मोशी येथे आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सचिन आणि अक्षय या दोघांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून एक डंपर, एक टेम्पो, एक हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल, 16 तेलाचे डबे आणि 20 किलो कॉपरच्या तारांचे तुकडे असा एकूण 13 लाख 45 हजार 575 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

एकूण चार गुन्हे उघडकीस
यामुळे पुणे शहर मधील एमआयडीसी भोसरी आणि निगडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक आणि पुणे ग्रामीणमधील चाकण आणि लोणीकंद पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच सचिन याचे दोन साथीदार निलेश सुनील पवार (वय 23, रा. आदर्शनगर, मोशी) आणि करन कुमार जाधव (वय 23, रा. वडगाव रोड, आळंदी) यांना यापूर्वी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पिंपरी आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. निलेश आणि करन यांच्याकडून एक लाख 30 हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकल जप्त करण्यात आल्या.

वरील चार आरोपींकडून एकूण 14 लाख 75 हजार 575 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे, पोलीस हवालदार अजय भोसले, रवींद्र तिटकारे, पोलीस नाईक किरण काटकर, पोलीस शिपाई नवनाथ पोटे, विजय दौंडकर, अमोल निघोट, करन विश्‍वासे, विशाल काळे, राजेंद्र जाधव यांच्या पथकाने केली.