चार तलवारीसह आरोपी ताब्यात

0

जळगाव । शहरातील पांझारपोळ चौक विठ्ठल पेठ परीसरात अवैधरित्या शस्त्रे वागळणार्‍यास एलसीबी आणि शनिपेठ पोलीसांनी संयुक्तरित्या कारवाई करत त्याच्या ताब्यातील चार लोखंडी तलवार आणि एक फरशी कुर्‍हाडसह आरोपीस ताब्यात घेतले आहे. याबाबत शनिपेठ पोलीसात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येत्या 18 मे पर्यंत ही कारवाई पोलीस दलातर्फे करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर पोलीस निरीक्षक बच्चनसिंग यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या दोन कर्मचार्‍यांकडून एक आरोपी शहरातील पांझरापोळ चौक विठ्ठल पेठ परीसरात विकास पान सेन्टरमध्ये विना परवाना लोखंडी शस्त्रे असल्याची गोपनिय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांना मिळाली.

अवैधरित्या शस्त्रे बाळगणार्‍याची खात्री करण्यासाठी पोलीसांनी खासगी वाहनाने पांझरापोळ चौकातील विठ्ठल पेठ आणि जोशी पेठ या भागात सायंकाळी 4.40 वाजेच्या सुमारास विकास पान सेंटरवरील चालक गणेश प्रकाश सपकाळे (वय-32, विठ्ठल पेठ) यांची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे व असमाधानकारक दिल्याने त्यांच्यावर संशय घेत पान टपरीची तपासणी केली. या तपासणीत पोलीसांना पान टपरीच्या दुकानाच्या छताच्या पत्र्यावर एका गोणीत चार तलवारी आणि फरशी कुर्‍हाड असे मुद्देमाल मिळून आल्याने सर्व तलवारी व कुर्‍हाड जप्त करून आरोपी गणेश सपकाळे याला ताब्यात घेतले.

यांनी केली कारवाई
एमआयडीसी पोउनि रोहन खंडागळे, पो.ना. राजेश मेंढे, प्रदिप चौधरी, संजय हिवरकर, पोहेकॉ दिनेशसिंग पाटील, पंच जगन्नाथ सोनवणे, सलमान भिस्ती, सतिश चौधरी, शनिपेठ पोलीस निरीक्षक प्रविण वाडिले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी कारवाई केली. 7 मे रोजी देखील शनिपेठ पोलीसांनी कांचन नगर घरकुल भागात रात्री 11.30 वाजता पायी तपासणी करत असतांना आरोपी भगवान सुकदेव सपकाळे (वय-34) रा. कांचन नगर यांच्याकडे 24 सेमी लांबीचे धारदार चॉपर आणि 5 हजार 330 रूपयांचे देशी-विदेशी दारू, हनूमान मंदीराजवळ राकेश उर्फ लिंबू राक्या चंद्रकांत साळुंखे (वय-23) कांचन नगर याची झडाझडती घेतली असता 13 इंची लांबीचा धारदार चॉपर, गुरूनानक भागात मध्यरात्री 1.50 वाजता नाईट कोम्बिंग करत असतांना आरोपी लखन भगवान सारवान (वय-29) रा. गुरू नानक नगर याच्याघरात 29 सेमीचा चॉपर आढळून आला होता. तर एमआयडीसी पोलीसांनी एका आरोपी अनिल पुनमचंद राठोड (रा. आंबेवडगाव ता.पाचोरा) हा मासूमवाडीच्या पुलावर कमरेला गावठी बनावटीचे पिस्टल लावून फिरत असतांना अटक केली होती.

आत्तापर्यंतची कारवाई
3 ते 18 मेपर्यंत पोलीसांना शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील संवेदनशिल भागात पोलीसांनी कारवाई करत मुद्देमालासह आरोपींना अटक करण्यात आली आहे. आत्तापर्यंत केलेल्या कारवाई जिल्हा पोलीस दलातर्फे 1 पिस्टल, 3 कट्टे, 8 तलवार, दोन चॉपर, एक सुरा असा मुद्देमाल जप्त करत आरोपींना अटक करण्यात आली आहे.