नंदुरबारातील डॉक्टरांची शस्त्रक्रिया यशस्वी : अपघानंतर डोळ्याजवळ घुसली फांदी
नंदुरबार- दुचाकी अपघातातून एका तरुणाच्या नाकात आर-पार घुसलेली दोन इंच आकारातील सागवानी लाकडाची फांदी आव्हानात्मक पण यशस्वी शस्त्रक्रिया करून काढण्यात नंदुरबार येथील भगवती हॉस्पिटलचे नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉक्टर राजेश कोळी यांना यश आले आहे. चक्क 16 तासापासून नाकात अडकलेली सागवानी लाकडाची फांदी चार तास शर्थीचे प्रयत्न करून डॉक्टरांच्या चमूने सुखरूप बाहेर काढली आहे. या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, 2 ऑक्टोंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अक्कलकुवा तालुक्यातील लालपुर येथील तुलसीदास बहादर सिंग पाडवी (26) या तरुणाच्या दुचाकीला भराडीपादर ते कुवा दरम्यान असलेल्या डोंगराळ भागात अपघात झाला होता .या अपघातात त्याच्या डोळ्यातील खालच्या बाजूपासून नाकात आर पार सागवानी लाकडाची फांदी घुसली होती. अशा अवस्थेत तो तरुण रस्त्याच्या कडेला पडला होता. खूप वेळा नंतर त्या भागातील सुजाण शिक्षकाच्या नजरेस हा जखमी तरुण पडला. त्याची चौकशी करून प्राथमिक उपचारासाठी सुरुवातीला खापर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व त्यानंतर नंदुबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाच्या नाकात घुसलेली फांदी पाहता त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करणे शक्य झाले नाही, म्हणून त्या जखमी तरुणाला शहरातील भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी नाक कान घसा तज्ञ डॉक्टर राजेश कोळी यांनी रुग्णाच्या परिस्थितीचा विचार करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत चक्क चार तास शस्त्रक्रिया करून सुमारे दोन इंच आकारातील नाकातून आरपार घुसलेली सागवानी लाकडाची फांदी काढण्यात यश मिळवले आहे,या रुग्णाच्या तोंडाला 10 ते 12 ठिकाणी जखमा देखील होत्या, शर्तीचे प्रयत्न करून आव्हानात्मक असलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर राजेश कोळी यांना भूलतज्ञ डॉक्टर जगदेव, डॉक्टर राहूल वसावे यांनी मदत केली. यापूर्वी देखील डॉक्टर राजेश कोळी यांनी नाक कान घसाच्या अवघड शस्त्रक्रिया केल्या असून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.