पुणे : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्यपी वाहन चालकांकडून होणारे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. गेल्या चार दिवसांत वाहतूक पोलिसांकडून 393 मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली आहे.
नववर्षादरम्यान शहरात गंभीर स्वरुपाचे अपघात घडण्याचे प्रमाण विचारात घेऊन पोलिसांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. मद्यपी वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्याचा वेग वाढविला आहे. वाहतूक शाखेच्या विभागांकडे मद्यपी वाहन चालकांची तपासणी करण्यासाठी 22 ब्रिथ ऍनालायजर यंत्र आहेत. महापालिकेने वाहतूक शाखेला आणखी काही यंत्रे नुकतेच उपलब्ध करून दिले आहेत. वारजे, कोरेगाव पार्क, शिवाजीनगर वाहतूक विभागांना अतिरिक्त ब्रिथ ऍनालायजर उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले.