वालचंदनगर । अंथुर्णे येथील चार दुकानेफोडून चोरट्यांनी 4 हजार 370 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि. 8) रात्री घडली. याप्रकरणी वालचंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अभिजीत साबळे यांचे मोबाईल शॉपी, योगेश शिंदे यांचे विद्युत पंप रिवायडिंग, स्वप्नील खरात यांचे फुटवेअर तसेच अमोल शिंदे यांचे पान टपरीचे कुलूप तोडून चोरांनी रात्री फोडून या तीनही दुकानातून 4 हजार 370 रुपयांचा ऐवज चोरून नेला. तसेच योगेश शिंदे यांच्या दुकानातील जुन्या तांब्याच्या तारेची चोरी करण्यात आली. तसेच गावातील अंगणवाडीची व एका शाळेच्या वर्गाची कुलपे तोडली. परंतु चोरट्यांना तिथे काहीच मिळाले नाही. तर एका हार्डवेअर मशिनरीच्या दुकानाचे शटर उचकटता न आल्याने चोरांचा प्रयत्न फसला. याप्रकरणी स्वप्नील खरात यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलिस हवालदार महेंद्र फणसे करीत आहेत.