रायपूर: छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील जागरगुंडा येथे आज नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक उडाली. यात चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
सुकमा जिल्ह्यातील बीमापूरमपासून १ किलोमीटरच्या अंतरावर ही चकमक झाली. कोबरा २०१ बटालियनचे कमांडो सर्च ऑपरेशन करत असताना काही नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या जवानांनीही गोळीबार केला. चारही नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहेत. हे चारही नक्षलवादी त्यांच्या यूनिफॉर्ममध्ये होते. त्यांच्याकडून १ रायफल आणि दोन थ्री नॉट थ्री रायफल ताब्यात घेण्यात आल्या आहेत. गोळीबार थांबल्यानंतरही जवानांनी या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू ठेवले आहे.