वरिष्ठ न्यायमूर्तींच्या आरोपांचे समर्थन; नियम, काम पारदर्शक ठेवण्याचा सल्ला
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र डागले असतानाच, आता चार माजी न्यायमूर्तींनीही सरन्यायाधीशांना खुले पत्र लिहून त्यांना पारदर्शक व नियमानुसार कामकाजाचा सल्ला दिला आहे. तसेच, चारही न्यायमूर्तींच्या आरोपांचे समर्थन केले आहे. या माजी न्यायमूर्तीत प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष पी. बी. सावंत, दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती ए. पी. शहा, मद्रास उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के. चंद्रू आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. सुरेश यांचा समावेश आहे. त्यांच्या या पत्राने सरन्यायाधीश पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडले आहे. दुसरीकडे, बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या सात सदस्यीय समितीने वरिष्ठ न्यायमूर्तींची भेट घेऊन रविवारी दिवसभर समेटाचा प्रयत्न केला.
भविष्यात असे प्रकार टाळण्याचा सल्ला
माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्यासह चारही माजी न्यायमूर्तींनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नावे खुले पत्र लिहिले असून, त्यांच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र डागले आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायमूर्तींनी केलेल्या आरोपांचे समर्थन केले आहे. न्यायपीठाचे गठण करणे आणि सुनावणीसाठी खटल्यांचे वाटप करताना सरन्यायाधीशांनी आपल्या कामात नियम व पारदर्शकतेचे पालन करावे. असाच आरोप चार विद्यमान न्यायमूर्तींनीही आपल्या पत्रात व पत्रकार परिषदेत केला होता. सरन्यायाधीश महत्वाच्या खटल्यांचे वाटप करताना वरिष्ठांना डावलून आपल्या मर्जीतील कनिष्ठ न्यायालयांकडे हे खटले वर्ग करतात, असा त्यांचा प्रमुख आरोप होता. याच आरोपांचा पुनरुच्चारही माजी न्यायमूर्ती सावंत यांनी आपल्या पत्रात केला आहे. भविष्यात असे प्रकार होणार नाहीत, यासाठी सरन्यायाधीशांनी स्वतः व प्रशासकीय कारभारात बदल करावेत, असा सल्लाही या पत्राद्वारे सरन्यायाधीशांना देण्यात आलेला आहे.
वडिलांच्या मृत्यूचे राजकारण नको : अनुय लोया
दरम्यान, न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल काँग्रेससह राजकीय पक्षांनी संशय व्यक्त केला असतानाच, आपल्या वडिलांच्या मृत्यूचे राजकारण केले जाऊ नये, अशी विनंती लोया यांचे चिरंजीव अनुज लोया यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणाची सुनावणी घेणार्या न्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे. या खटल्यात भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे ठळक आरोपी आहेत. त्यावरून भाजप सद्या संशयाच्या भोवर्यात आहे. या खटल्याची लवकरच सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदेखील होणार आहे. या पार्श्वभूमीवर अनुज लोया यांच्या पत्रकार परिषदेने सरन्यायाधीशांसह भाजपलादेखील मोठा दिलासा मिळालेला आहे.