मुंबई । हिंदी पत्रकारितेचे पितामह बाबूराव विष्णूराव पराडकर यांचे त्यांचे महाराष्ट्रातील जन्मगाव पराड, जिल्हा, सिंधूदुर्ग येथे मुंबई प्रेस क्लब, काशी प्रेस क्लब यांच्या प्रयत्नातून व महाराष्ट्रासह चार राज्य सरकारांच्या संयुक्त सहकार्यातून होणारे स्मारक हे मराठी व हिंदी आंतरसंबंध वृद्दिंगत करणारे असेलच परंतु हिंदी पत्रकारितेसाठी तर ते तीर्थ ठरेल अशा भावना आज येथे ज्येष्ठ पत्रकार व विचारवंतानी व्यक्त केल्या. मुंबई प्रेस क्लब कार्यालयात आज बाबूराव पराडकर यांचे हिंदी पत्रकारितेला योगदान व हिंदी-मराठी अंतरसंबंध या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रेस क्लब अध्यक्ष कुमार केतकर, काशी प्रेस क्लब अध्यक्ष सुभाष भारद्वाज, पत्रकारिता विश्व व विद्यालयाचे लाजपतराय अहुजा, सचिव राममोहन पाठक, बाबूराव पराडकर यांच्या हिंदी पत्रकारिता योगदानाचे अभ्यासक केशव पाठक, महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार एस.के. कुलकर्णी यांनी त्यांच्या भाषणामधून बाबूराव विष्णूराव पराडकर यांच्या हिंदी पत्रकारितेसाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपर उल्लेख केला. या वार्तालापाचे सूत्रसंचालन जागरण दैनिकीचे ओमप्रकाश तिवारी यांनी केले. यावेळी मराठी भाषिक असूनही हिंदीमध्ये पत्रकारिता करणार्या दहा पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.