चार लाख संरक्षण कामगार करणार उपोषण

0

भुसावळ । देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका लक्षात घेवून आयुध निर्माणीचे उत्पादन खाजगी कंपन्यांना देवून आयुध निर्माणीचे खाजगीकरण करण्याचा सरकारच्या धोरणाविरोधात अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघातर्फे 3 जुलैपासून आमरण उपोषण दिल्ली येथे जंतरमंतर, संसद भवन याठिकाणी सुरु आहे. या साखळी उपोषणाचा 30 वा दिवस पूर्ण करणार्‍या संरक्षण कर्मचार्‍यांना बळ देण्यासाठी तसेच त्यांचे समर्थनासाठी देशातील चार लाख संरक्षण कर्मचारी 1 ऑगस्ट रोजी एक दिवसाचा उपवास ठेवून आयुध निर्माणी खाजगीकरण व सरकारचा कामगारविरोधी धोरणाचा निषेध नोंदविणार आहे.

विविध संघटनांनी दर्शविला पाठिंबा
आयुध निर्माणी कामगार युनियनतर्फे मंगळवार 1 रोजी भुसावळचे कर्मचारी एकदिवसीय उपोषण करुन अखिल भारतीय सुरक्षा कामगार संघटनेतर्फे निर्देशित साखळी उपोषणाला समर्थन देत आंदोलन यशस्वी करतील. देशपातळीवर संरक्षण क्षेत्रातील सुपरवायझर, क्लरिकल तसेच एनजीओ असोसिएशन मान्यताप्राप्त सिड्रा संघटनेनेही पाठिंबा दर्शविला आहे.

कामगार दिल्लीला होणार रवाना
अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघातर्फे सुरु असलेल्या साखळी उपोषणात सहभागी होण्यासाठी भुसावळचे 40 कर्मचारी 1 रोजी सायंकाळी मंगला एक्स्प्रेसने दिल्लीला रवाना होतील. तसेच 3 रोजी जंतरमंतर व संसद भवनावर एक दिवस उपोषण करणार आहे. या उपोषणाचे नेतृत्व उपाध्यक्ष कॉ. राजेंद्र झा करतील. तरी या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन दिनेश राजगिरे यांनी केले आहे.