चार वर्षांच्या मुलीला शिक्षिकेकडून मारहाण

0

कल्याण । चार वर्षाच्या मुलीला ट्युशन टीचरने मारहाण केल्याची घटना कल्याण पश्‍चिम रोहिदास वाडा येथे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात सदर मुलीच्या कुटुंबासह तक्रार नोंदवण्यास गेलेल्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने श्रीमुखात लागवल्याची घटना घडली. ही बातमी शहरात पसरताच संतापलेल्या शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यात जमा होत एकच गोंधळ घालत घोषणाबाजी करत पोलीस अधिकार्‍यांचा निषेध व्यक्त केला. तर पोलिसांनी ट्युशन टीचरविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे. तर शिवसेना नेत्याला मारहाण केल्याचे आरोप पोलीस अधिकार्‍यांनी फेटाळले आहेत.

बाजारपेठ पोलिसांनी केली शिक्षिकेला अटक
कल्याण पश्‍चिमेकडील रोहिदास वाडा येथे राहणारी 4 वर्षाची मुलगी याच परिसरात राहणार्‍या आलिशा सारंगधर यांच्याकडे ट्युशनसाठी जाते. आलिशा हिने या मुलीला मारहाण केल्याचे निदर्शनास आल्या नंतर संतापलेल्या तिच्या कुटुंबीयांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी आलिशा विरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे.

पोलीस अधिकार्‍याने फेटाळले आरोप
पीडित मुलीच्या कुटुंबाने सदर बाब शिवसेनेचे स्थानिक नेते दीपक सोनाळकर यांना सांगितल्याने सोनाळकर ही पोलिस ठाण्यात दाखल झाले.
मात्र पोलिसांनी त्यांना कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत थांबण्यास सांगितले. त्यामुळे संतापलेल्या सोनाळकर याचा आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांनी श्रीमुखात लगावल्याचा आरोप केला. सोनाळकर याना मारहाण झाल्याचे वृत्त पसरताच शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत एकच गोंधळ घातला. तसेच पालसकर यांच्या वर्तणुकीचा निषेध करत घोषणाबाजी करत कारवाईची मागणी केली. तर पालसकर यांनी मात्र सोनाळकर यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत.