पुणे । मुलगा ऐकत नाही म्हणून उच्च शिक्षीत आईने आपल्या चार वर्षाच्या मुलाला मेणबत्ती व सुरी गरम करून चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा परिसरात उघडकीस आला आहे. सदर मुलगा आजोळी आल्यानंतर हा प्रकार समोर आला.
डॉ. अर्चना (वय 68, रा. पाषाण रोड) यांचा मुलगा, सून व चार वर्षांचा नातू मोहंमद वाडी परिसरात राहतात. मुलगा आणि सून उच्चशिक्षीत असून ते खाजगी कंपनीत नोकरी करतात. त्यांचा चार वर्षांचा मुलगा सांगितलेले काही ऐकत नसल्यामुळे त्याच्या आईने त्याला मेणबत्तीने दोन्ही पायाच्या पंजावर चटके दिले. तसेच, सुरी गरम करून डाव्या हाताच्या कोपरावर आणि पायाच्या नडगीवर चटके दिले आहेत. हा प्रकार गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे. अर्चना यांनी क्लाससाठी म्हणून नातवाला त्यांच्या घरी आणले होते. त्यावेळी त्यांना नातवाच्या अंगावर चटके दिसले. याबाबत त्याला विचारल्यानंतर त्याने घडलेला प्रकार आजीला सांगितला. याबाबत अर्चना यांनी त्यांच्या मुलाकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांच्या मुलाने तो खोटे बोलत असल्याचे सांगत त्याला घरी नेले. यावरून अर्चना आणि त्यांच्या मुलाचे भांडणही झाले. याबाबत अर्चना यांनी कोंढवा पोलिसांकडे तक्रार दिली. महिला उपनिरीक्षक मोरे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.