मुंबई : बनावट नोटांना आळा घालण्यासाठी तसेच नव्या नोटा जास्तीत जास्त सुरक्षित राहाव्यात यासाठी दर तीन-चार वर्षांनी नोटांच्या सुरक्षा चिन्हांमध्ये बदल करण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अर्थ मंत्रालय आणि केंद्रीय गृह खात्याच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. अनेक विकसित देशांमध्ये दर तीन ते चार वर्षांनी नोटांमधील सुरक्षेचे फीचर्स बदलले जातात. मात्र आपल्या देशात मोठ्या किंमतीच्या नोटांमध्ये अनेक वर्षांपासून बदलच करण्यात आले नव्हते. गुरुवारी अधिकार्यांच्या झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत गृह मंत्रालयाच्या अधिकार्यांनी हा मुद्दा मांडला. या बैठकीला गृह मंत्रालयाचे सचिव राजीव महर्षी तसेच वित्त आणि गृह मंत्रलायातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून बदलच नाहीत!
चलनातील नव्या नोटांमध्ये अतिरिक्त सुरक्षेचे फीचर्स देण्यात आलेले नाहीत. या नोटांमधील फीचर्स हे जुन्या 1000 आणि 500 रुपयांच्या नोटांप्रमाणेच आहेत. 1000 रुपयांची नोट 2000 मध्ये आली होती. त्यानंतर या नोटेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर 1987 मध्ये आलेल्या 500 रुपयांच्या नोटेमध्ये गेल्या दहा वर्षाआधी बदल करण्यात आला होता. त्यामुळे आता नव्या नोटांच्या सुरक्षा चिन्हांमध्ये दर तीन-चार वर्षांनी बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. जगातील बहुतेक प्रगत देश दर तीन-चार वर्षांनी आपल्या नोटांचे सुरक्षा चिन्ह बदलत राहतात. त्याप्रमाणेच आपल्या देशातही अशाप्रकारचा बदल करायला हवा, असे या बैठकीत मत मांडण्यात आले होते.