डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा नातेवाइकांनी केला आरोप
जळगाव – चार वर्षीय चिमुकल्याचा आपल्या वाढदिनी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घाटना शिवराम नगरातील शिवम हॉस्पिटलमध्ये रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडली असून संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड करुन हॉस्पिटलचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले आहे. चिमुकल्याच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
रुग्णालयाची केली तोडफोड
याबाबत माहिती अशी की, मुक्ताईनगरातील अर्णव नीलेश पाटील (वय-४) या चिमुकल्याला निमोनिया झाल्याने त्याला शिवरामनगरातील डॉ. पंकज पाटील यांच्या शिवम हॉस्पिटलमध्ये ५ सप्टेंबर रोजी दाखल केले होते. तीन दिवसांपासून या चिमुकल्यावर उपचार सुरू होते. त्याच्या छातीत कफ झाल्याने डॉक्टरांनी काही तपासण्या करण्यासाठी त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवले. तत्पूर्वी या चिमुकल्याला डॉक्टरांनी इंजेक्शन दिले होते. तपासणी करून हॉस्पिटलमध्ये आणत असताना या चिमुकल्याला उलटी व शौच झाल्याने रिक्षातच त्याची प्रकृती खालावली. हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर या चिमुकल्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, डॉ. पाटील यांच्या हलगर्जीपणामुळे अर्णवचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नातेवाइकांनी हॉस्पिटलमध्ये संताप व्यक्त केला. रामानंद पाेलिसांनी नातेवाइकांची समजूत घातली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.