चार विषय समिती सभापती पदांसाठी भाजपतर्फे अर्ज

0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या सभापतीपदासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. विधी समितीच्या सभापतीपदासाठी शारदा सोनवणे, शहर सुधारणा समितीसाठी सागर गवळी, महिला व बालकल्याण समितीसाठी सुनीता तापकीर तर क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीसाठी लक्ष्मण सस्ते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या चारही समित्यांच्या सभापतीपदासाठी शनिवारी (दि. 15) निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. महापालिकेत भाजप पूर्ण बहुमतात असल्यामुळे चारही समित्यांच्या सभापतीपदी बिनविरोध निवड निश्चित आहे.

निवड निश्‍चितच केवळ औपचारिकता
चारही विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारी दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. महापालिकेत स्पष्ट बहुमत असल्यामुळे भाजपकडून चारही जागांवर ज्यांची नावे निश्चित केली जातील, त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जाते. त्यानुसार भाजपने विधी समिती सभापतीपदासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शारदा सोनवणे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी सुनीता तापकीर, शहर सुधारणा समिती सभापतीपदासाठी सागर गवळी आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापतीपदासाठी लक्ष्मण सस्ते यांची नावे निश्चित केली आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी महापौर नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार यांच्यासह पक्षाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.