भोर । वीसगाव खोर्यातील मौजे धावडी गावाच्या डोंगर रानात साळिंदरची शिकार करणार्या चार शिकारींना वनरक्षक ए. के. होनराव व वनपाल सुरेश काळे यांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून खोचिरा व रॉकेलही जप्त करण्यात आले आहे.
नारायण नथू जाधव (वय 40), हरिभाऊ नथू जाधव (वय 42), चंद्रकांत बबन परखंदे (वय 42), व बाळू नथू जाधव (वय 35) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेची माहिती भोरचे वनपरिक्षेत्र अधिकारी के. एम. येळे यांना कळवली असता ते घटनास्थळी दाखल झाले. मारलेल्या साळिंदरचा पंचनामा करून त्यांनी या चौघांविरुद्ध वन्य प्राण्याच्या हत्येचा गुन्हा नोंदवला. भोरच्या न्यायालयाने त्यांना वनविभागाची पोलीस कोठडी सुनावली आहे. वन विभागाचे पोलीस उपविभागीय वनाधिकारी बी. पी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.