जयपूर । टी-20 क्रिकेटमध्ये नेहमीच नवीन विक्रम रचले जातात. जयपूरमधील एका टी-20 सामन्यात चार षटकामध्ये दहाही बळी घेण्याचा विक्रम आकाश चौधरी या युवा खेळाडूने केला आहे. त्याने स्थानिक टी-20 सामन्यात हा कारनामा केला. आकाशची गोलंदाजी एवढी भन्नाट होती की त्यानं आपल्या चारही षटकात एकही धाव दिली नाही. सामना संपल्यानंतर त्याचा स्पेल 4 ओव्हर 4 मेडन आणि 10 विकेट्स असा होता.
भारताकडून अनिल कुंबळेनं एका कसोटी सामन्यात एका डावात 10 विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. जयपूरमध्ये खेळवण्यात येणार्या भंवर सिंह स्मृती क्रिकेट स्पर्धेत डावखुरा वेगवान गोलंदाज आकाशनं ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जयपूरमधील या स्पर्धेत पर्ल अकॅडमीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे फलंदाजीला आलेल्या दिशा क्रिकेट अकॅडमीने 20 षटकात 156 धावा केल्या. पण त्यानंतर मैदानावर जे काही झालं त्यानं सर्वच हैराण झाले. आकाशने पर्ल अकॅडमीच्या संपूर्ण संघाला अवघ्या 36 धावामध्ये गुंडाळले. आकाशने पहिल्या षटकात दोन विकेट्स घेतल्या. तर दुसर्या आणि तिसर्या षटकामध्येही दोन-दोन विकेट्स मिळवल्या. तर चौथ्या षटकामध्ये त्याने उरलेल्या चारही जणांना बाद केले. यावेळी त्याने हॅटट्रिक देखील घेतली. पर्लचे सात फलंदाज हे शून्यावर बाद झाले.
10 व्या वर्षापासून खेळायला सुरुवात
एकाच सामन्यात 10 विकेट्स घेणार्या आकाशला आपण विक्रमाला गवसणी घातली आहे याची माहितीच नव्हती. तो क्रिकेट खेळण्यातच व्यस्त होता. अभ्यासापेक्शा क्रिकेटला जास्त महत्व देणार्या आकाशने मोठ्या भावाला खेळताना पाहून वयाच्या 10 व्या वर्षापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. यावर्षी त्याला 10 वीची परिक्शा द्यायची आहे पण तो मात्र क्रिकेटच्या मैदानातच रमलेला असतो. आकाश म्हणाला की आमची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. 10 वर्षाच्या असताना मोठ्या भावाला क्रिकेट खेळताना बघायचो. ते बघूनच मी क्रिकेटचे धडे गिरवायला लागलो. एकदा क्रिकेट खेळायला लागलो की मला इतर कशाची आठवण होत नाही. अभ्यास, शाळा सोडून मी क्रिकेटच खेळत राहतो. घरच्यांनाही माझे क्रिकेटवेड माहित आहे. वडिलांनी तर त्याला एकवेळ आम्ही उपाशी राहू पण तुला क्रिकेटसाठी काही कमी पडू देणार नाही. कमी पैसा असूनही वडिलांनी बिकानेरमधील अरावली क्रिकेट अॅकेडमीत दाखल केले. याठिकाणी आकाश विवेक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
झहिरकडून टीप्स पाहिजेत
मध्यमगती गोलंदाजी करणार्या आकाशच झहिर खान हा फेव्हरिट गोलंदाज आहे. आकाश म्हणतो, झहिर खानची गोलंदाजी मला आवडते. तो माझा आदर्श आहे. त्याच्यासारखाच मला शानदार गोलंदाज व्हायचे आहे. झहिरची स्टंपला धरुन असलेली अचूक टप्प्याची गोलंदाजी मला आवडते. मला झहिरभाईला भेटायचे आहे. त्याच्याकडून खूप काही शिकायचे आहे. ती संधी मिळाल्यास मी भाग्यशाली असेल.