पिंपरी-चिंचवड : दापोडी येथील जागेच्या सातबारा उतार्यावर वारस नोंद करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तलाठी वैशाली अशोक कोळेकर (वय 30, रा. खडक, पुणे) यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई 11 रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात कोळेकर यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच हजार रुपयांची मागणी
लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तक्रारदाराने दापोडीतील जागेच्या सातबारा उतार्यावर वारस नोंदणीसाठी बोपोडी तलाठी कार्यालयाकडे अर्ज केला होता. वारस नोंदणी करून देण्यासाठी तलाठी वैशाली कोळेकर यांनी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. म्हणून तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
तक्रारीची पडताळणी
या तक्रारीची पडताळणी केली असता वैशाली कोळेकर यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोडीअंती तक्रारदाराने चार हजार रुपये लाच देण्याचे मान्य केले. त्यानुसार मंगळवारी खडक येथील तलाठी कार्यालयात चार हजारांची लाच घेताना कोळेकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.