मुक्ताईनगर । येथील स्थानकात बस आणत असतांना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे येथे थोडा वेळ भितीचे वातावरण निर्माण झाले. यात सुदैवाने जिवीतहानी झाली नसली तरी सहा प्रवाशी जखमी झाले असून सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, यातील जखमींवर उपचार सुरू होते.
सहा प्रवाशी जखमी
मुक्ताईनगर बस स्थानकामध्ये जामनेर आगाराची बर्हाणपूर ते जामनेर ही बस अंदाजे साडेअकरा वाजेच्या सुमारात आली असता चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे बस फलाटावर आदळली. या अपघातात राधाबाई ज्ञानेश्वर पाटील रा.मोहोद (मध्यप्रदेश), पंढरीनाथ सुकदेव टपरा, रा.पळासखेडा,ता.जामनेर, अंजना भागवत बेलदार, रा.मोहोद (मध्यप्रदेश), रुख्माबाई अशोक सुर्यवंशी, रा. मोहोद (मध्यप्रदेश), रुख्मिणीबाई ठाणसिंग राजपूत, रा. मोहोद (मध्यप्रदेश), पुंडलिक कडू पाटील (रा.धाबेपिप्री,ता.मुक्ताईनगर) हे जखमी झालेले आहेत. या जखमींवर मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तथापि, रात्री उशीरापर्यंत पोलीसात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.