जालना जिल्ह्यातील गुन्ह्याचा जळगाव एलसीबीकडून छडा ;गेंदालाल मिलमधील दोघांना अटक
जळगाव- आंध्रप्रदेश येथुन 12 लाख रुपयांचे मासे घेऊन सुरत येथे विक्रीस जात असलेला ट्रक जळगावातील चौघांनी जालन्याजवळ अडवला. यानंतर ट्रकचालक व क्लिनरचे अपहरण करुन हा ट्रक सुरत येथे घेऊन जात ट्रकमधील 12 लाख रुपये किंमतीच्या माशांची परस्पर विक्री केली होती. याप्रकरणी जालना जिल्हयातील मौजपुरी येथील पोलीस ठाण्या गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या जाळ्यात चार संशयितांपैकी शकील उर्फ महाराज शेख बाबु, रिजवान अली रजा अली (दोघे रा.गेंदालाल मिल) दोघे अडकले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. उर्वरीत संशयित बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे.
चॉपरचा धाकावर चालकासह क्लिनरचे अपहरण
आंध्रप्रदेश येथुन सुभैय्या मनिक्यलाराव कौलम (रा.आंध्रप्रदेश) यांचा ट्रक (एपी 07 टीबी 6989) आठ दिवसांपूर्वी सुरत जाण्यासाठी निघाला होता. या ट्रकमध्ये 12 लाख रुपये किमतीचे मासे होते. सुरत येथील मार्केटमध्ये मास्यांची विक्री होणार असल्याची पक्की खबर जळगावातून शकील उर्फ महाराज शेख बाबु, रिजवान अली रजा अली (दोघे रा.गेंदालाल मिल) व त्यांचे दोन साथीदार अशा चौघांना मिळाली. त्यानुसार चौघे चारचाकीने जालना गेले. जालन्याजवळील डुकीपिंप्री टोलनाक्यापासून काही अंतरावर चारचाकी समोर उभी करुन ट्रक अडविला. यानंतर चॉपरचा धाक दाखवून ट्रकचालक कोट्टा श्रीनिवास राममूर्ती व क्लिनर प्रभाकर निक्यकोलाराव कौलम या दोघांच्या डोक्यात पिशवी घालुन अपहरण केले. ट्रकमालक सुभैय्या कौलम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जालना जिल्ह्यातील मौजपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चॉपरचा धाक दाखवून 12 लाख रुपयांचे मासे, 10 लाख रुपयांचा ट्रक व 8 हजार 500 रुपये रोख पळवून नेल्याचा हा गुन्हा आहे.
सुरतला ट्रक घेवून जात विकले 12 लाखांचे मासे
रिजवान व शकील यांच्यासोबत जळगावातील दोन साथीदार होते. या चौघांनी हा लुटीचा प्लॅन तयार केला. ठरल्यानंतर ते ट्रकवर नजर ठेऊन होते. दरम्यान, या चौघांनी ट्रकचालक कोट्टा व क्लिनर प्रभाकर या दोघांचे अपहरण करुन थेट जळगावातील एकाच्या घरात आणून ठेवले होते. दोघांना जीवेठार मारण्याची धमकी दिल्यामुळे त्यांनी प्रतिकार केला नाही. या दोघांची चांगली व्यवस्था जळगावात केली होती. त्यामुळे ते निवांत राहत होते. चौघांपैकी एकाने ट्रकचा ताबा घेऊन हा ट्रक थेट सुरत येथे ठरलेल्या मार्केटमध्ये नेला. दोन दिवसांनंतर मार्केटमध्ये 12 लाख रुपयांचे मासे विकले होते. यानंतर ट्रकचालक कोट्टा व क्लिनर प्रभाकर या दोघांना परत जालना येथे सोडले. तेथेच त्यांच्या ताब्यात ट्रक दिला होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या पथकाची कामगिरी
सुरत येथे सर्व मासे विकले गेल्यानंतर ट्रक पुन्हा जालना गावाजवळ आणला. यानंतर दोघांना चारचाकीने जालना येथे नेऊन सोडले होते. या घटनेची कुणकुण जळगावात लागल्यामुळे पोलिस सतर्क झाले होते. त्यानुसार या गुन्ह्याचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील नाईक, विजयसिंग पाटील, अशोक महाजन, सुरज पाटील, सचिन महाजन, भगवान पाटील, विजय शामराव पाटील, विकास वाघ, विजय पाटील व नरेंद्र वारुळे यांच्या पथकाने गुरूवारी शकील व रिजवान या दोघांना जळगावातून ताब्यात घेतले. खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील चौकशीसाठी त्यांना मौजपुरी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.