चालकास बंदुकीचा धाक दाखवून ट्रक पळविला

0

धुळे । बंदूकीचा धाक दाखवून ट्रकचालकासह दोघांना बांधून सोयाबीनने भरलेला ट्रक दरोडेखोरांनी पळवून नेला. सुमारे 11 लाखांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी यावेळी लुटून नेला. हा प्रकार धुळे येथील अवधान एमआयडीसी परिसरात घडला. याप्रकरणी 8 दरोडेखोरांविरुध्द मोहाडी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

अनिल साहेबराव लाड (वय 36) रा.पिंपळगांव, ता.केज जि.बीड या चालकाने दि.14 रोजी केज येथून सोयाबीनने भरलेला ट्रक क्र. एम.एच.43/ ई-3475 हा अवधान एमआयडीसीतील महाराष्ट्र अ‍ॅक्सस्ट्रॅक्शन प्रा.लि.कंपनीच्या गेटसमोर उभा केला आणि चालक लाड व व्यवस्थापक गोविंद रामनाथ अंडिल हे दोघे त्या रात्री ट्रकच्या कॅबिनवर झोपले होते. याच वेळी दोन दरोडेखोरांनी ट्रकच्या कॅबिनवर झोपलेल्या चालक लाडसह अंडिल यांच्या डोक्यास गावठी कट्टयासारखे हत्यार लावून ट्रकची चाबी मागितली. ट्रकची चाबी मिळताच दरोडेखोरांनी चालकासह अंडिल यांचे हात-पाय बांधून ट्रक पळविला.

मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल
हा ट्रक अवधान एमआयडीसी येथून 25 ते 30 कि.मी.अंतरावर थांबवून दरोडेखोरांच्याच साथीदारांनी आणलेल्या महिंद्रा कंपनीचे वाहनात ट्रक चालक लाड व अंडिल यांना कोंबले आणि सोयाबीनने भरलेला ट्रक दरोडेखोरांनी पळवून नेला. ट्रकमधील 19 हजार रूपये रोख, 10 हजार 700 रूपये किंमतीचे दोन मोबाईल, 5 लाख रूपये किंमतीचे 16 टन वजनाचे सोयाबीन व 5 लाख 50 हजार रूपये किंमतीचा ट्रक असा 10 लाख 79 हजार 700 रूपये किंमतीचा मुद्देमाल दरोडेखोरांनी जबरीने लुटून नेला. या प्रकरणी चालक अनिल लाड याच्रा फिर्यादीनुसार 8 दरोडेखोरांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.