चालत्या दुचाकीवरून महिलेचे गंठन हिसकावले

0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी येथील मार्केटमध्ये खरेदी करून दुचाकीवरून चिखलीकडे जाणार्‍या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेले. ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास पिंपरी, एमआयडीसीतील एच ब्लॉक येथे घडली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीवरून आले चोरटे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा सुनील पाटील (वय 27, रा. चिखली) या पिंपरीगाव येथून खरेदी करून त्यांच्या पतींसोबत दुचाकीवरून चिखलीकडे जात होत्या. त्याचवेळी पिंपरी, एमआयडीसीतील एच ब्लॉक परिसरात दोन अज्ञात चोरट्यांनी पाठीमागून दुचाकीवरून येऊन मनिषा पाटील यांच्या गळ्यातील मिनी गंठन हिसकावून नेले. यामध्ये गंठणचा अर्धा भाग चोरट्यांच्या हाती लागला तर अर्धा मनिषा यांच्याजवळच राहिला. अंधार असल्यामुळे चोरट्यांची ओळख पटू शकली नाही. यामध्ये 40 हजार किंमतीचे दीड तोळे वजनाचे सोने चोरीला गेले आहे. या घटनेनंतर मनिषा पाटील यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.