*आमदार उन्मेष पाटील यांची संकल्पना; विकासकामांबाबत मार्गदर्शन
*27 जुलैपर्यंत तालुक्यातील पदाधिकारी, अधिकार्यांशी संवाद
चाळीसगाव – आमदार उन्मेष पाटील यांच्या संकल्पनेतून 24 जुलै ते 27 जुलैपर्यंत उन्नत ग्रामविकास अभियानाची सुरुवात चाळीसगाव येथे शासकीय विश्रामगृहात करण्यात आली. यावेळी प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांच्याशी गावात आवश्यक विविध विकासकामांबाबत आमदार उन्मेष पाटील यांनी चर्चा करीत आहेत.
सर्व विभागांचा सहभाग
पंचायत समिती सभापती, उपसभापती, स्थानिक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य हे करत आहेत. प्रशासन म्हणून या अभियानात पंचायत समितीतील गटविकास अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता, वीज वितरण चे अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता, गटशिक्षणाधिकारी, महिला बालविकास अधिकारी आदी ग्रामविकासाशी संबंधित सर्व विभाग सहभागी झाले आहेत.
अधिकार्यांकडून स्वागत
ग्रामपंचायत व प्रशासनाचा समन्वय व्हावा, येणार्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून आमदार उन्मेष पाटील यांच्या संकल्पनेतून उन्नत ग्रामविकास अभियान ही संकल्पना मांडण्यात आली. ही संकल्पना सर्व प्रशासकीय अधिकार्यांना सांगितली असता त्यांनीही या सुचनेचे स्वागत केले.
असा आहे कार्यक्रम
त्यानुसार तालुक्यातील 7 जिल्हा परिषद गट निहाय हे अभियान राबविण्याचे ठरले. यात 24 रोजी सकाळी करगाव – टाकळी प्रचा व दुपारी रांजणगाव – पाटणा, 25 जुलै रोजी सकाळी बहाळ-कळमडू व दुपारी पातोंडा – वाघळी,26 रोजी मेहुनबारे-दहिवद व उंबरखेड सायगाव,27 रोजी देवळी – तळेगाव या जिल्हा परिषद गटातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांना आमंत्रित करण्यात येऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जात आहेत. जलयुक्त शिवार योजनेमध्ये समाविष्ठ केल्याबद्दल वडगाव लांबे ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार उन्मेश पाटील यांचा सत्कार केला.