शहरात झळकली थकबाकीदारांची नावे
चाळीसगाव – पालिकेच्या वार्षिक घरपट्टी, पाणी पट्टी वसुली मोहीम जोरात सुरू असून सुमारे १७ कोटींच्या रक्कमेची वसुलीसाठी वीस कर्मचारी घरोघरी जाऊन वसुली करताना दिसत असून थकबाकीदारांची नावे भर चौकात प्रसिद्ध करण्यात आल्याने बड्या थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे. वसुलीसाठी ३१ मार्च रोजी रविवारची सुटी असूनही वसुली विभाग सुरू राहणार असल्याचे पालिकेच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. यंदा अभूतपूर्व प्रतिसाद लाभल्याने पालिकेची वसुली १०० टक्के होईल अशी चिन्हे दिसत आहेत.
सुमारे साडे पंधरा कोटींची वसुली ?
पालिकेच्या शहराची हद्द वाढत असताना पालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. एकट्या घरपट्टी विभागाची वसुली ११ कोटी ३५ लाखांपर्यंत येणे बाकी आहे. तर पाणीपट्टी थकबाकी ही चार कोटी रुपयांची अपेक्षित आहे. यासाठी कर निरीक्षक माधव कुटे, अव्वल होशीबनीस राहुल साळुंखे यांचेसह सतरा कर्मचारी घरोघरी जाऊन वसुली करीत आहे.
शहरात २०६५१ घरे आहेत. त्यात १७०६९ निवासी तर ३५९२ व्यावसायिक घरे असून नळ धारकांची संख्या १४१९९ आहे. यात १४९५३ निवासी तर २४६ व्यावसायिक नळ पट्टी धारक आहेत. आजपर्यंत साठ टक्के वसुली करण्यात आली असून येत्या तीन चार दिवसांत नव्वद टक्के वसुलीचा प्रयत्न सुरू असल्याचे कर निरीक्षक माधव कुटे यांनी सांगितले.
गाळे धारकाकडून १००% वसुली
शहरात एकूण ७५० न.पा. गाळे धारक आहेत. यात पालिकेचे ४५० तर ३०० बीओटी गाळे धारक यांचा समावेश आहे. यावर्षी नुतनीकरण करण्यात आल्याने बांधकाम विभागाची वसुली १०० टक्के कडे पोहचली आहे. ज्या गाळे धारकांनी ३१ मार्च पर्यंत भरणा केला नाही त्यांना १२ टक्के व्याजाचा भुर्दंड सोसावा लागतो. यासाठी जास्तीत जास्त वसुली व्हावी यावर आमचा भर आहे अशी माहिती बांधकाम विभागाचे नंदू जाधव यांनी दिली आहे.
भर चौकात लावली नावे
पालिकेच्या काही बड्या थकबाकीदारांची नावे वसुलीसाठी भर चौकात फलक लावून प्रसिद्ध करण्यात आली आहे. थकबाकीदारांनी मार्च आधी भरणा करून १० टक्के नोटीस फी तसेच १० टक्के व्याज या दंडापासून नागरिकांनी आपली सुटका करावी असे आवाहन पालिकेचे मुख्याधीकारी अनिकेत मानोरकर यांनी ‘दै. जनशक्ति’ शी बोलताना दिली.