चाळीसगाव । विविध ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे करून मालमत्तांची विक्री करणार्या चाळीसगाव येथील भाजपच्या नगरसेवकाचे पद रद्द करावे अशी मागणी चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नारायण जेठवानी यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्याकडे केली असून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात या तक्रारीवर सुनावणी होणार आहे.
तोडफोड करुन जादा बांधकाम
चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नारायण जेठवानी यांनी भाजप नगरसेवक शेखर कन्हैयालाल बजाज यांच्याविरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार बजाज यांनी शहरातील गणेश रोडवर गणेश कॉम्प्लेक्सचे 5 सहकार्यांच्या मदतीने बांधकाम केलेले आहे. कराराप्रमाणे 25 टक्के बांधकामाचा हिस्सा नगरपरिषदेस मोफत दिला पाहिजे, कॉम्प्लेक्सच्या मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम झाल्यानंतर तोडफोड करून बेकायदेशीर अतिरिक्त गाळे बांधून विक्री केले आहे. मैत्रेय प्लॉटिंग सर्व्हिसेसला तिसर्या माळ्यावरचे गाळे विकून 25 टक्के बांधकाम पालिकेस दिललेे नाही व पदाचा गैरवापर केला आहे.
बंगल्याचे बांधकाम बेकायदा
बजाज हे बाबा हरदास राम सिंधी एजुकेशन सोसायटीचे चेअरमन आहेत या संस्थेच्या मालकीची सिंधी कॉलनीत अनधिकृत 3 मजली इमारत आहे. संस्थेने अतिक्रमण करून बांधलेले स्व. चंडीराम बजाज स्मृती हॉल व इंदिरा गांधी सिंधी हायस्कुलचे अतिक्रमण केलेले मैदान या मिळकती आहेत.बजाज ज्या बंगल्यात राहतात त्या बंगल्याचे मंजूर बांधकामाव्यतिरिक्त त्यांनी बंगल्या लगत अतिक्रमण करून हॉल व खोल्या बांधल्या.