पात्रता फेरी जिंकून मिसेस इंटरनॅशनल साठी निवड : दुबईत होणार स्पर्धा
चाळीसगाव- येथील रहिवाशी व पोदार शाळेच्या शिक्षिका कविता संग्रामसिंग शिंदे यांनी नुकतीच नाशिक येथे झालेल्या मिसेस महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धेसाठीची लुमिअर स्पर्धा जिंकली असून दुबई येथे होणार्या मिसेस इंटरनशनल सौंदर्य स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
शहरातील बांधकाम व्यावसायीक संग्रामसिंग शिंदे यांच्या पत्नी असलेल्या कविता शिंदे या पोदार शाळेत शिक्षिका आहेत. त्या उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध असून मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषेत त्यांनी केलेले समालोचन कौतुकास्पद आहेत. नृत्य, चित्रकला, विविध खेळ व विद्यार्थी प्रिय शिक्षिका असलेल्या कविता शिंदे यांनी नुकतीच हॉटेल जुपिटर, नाशिक येथे स्वारा फाऊंडेशन आयोजित सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. 25 स्पर्धकांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेचे परीक्षण मिसेस इंडिया 2016 स्नेहा शेरगील यांनी केले. त्यांच्यासह डॉ.सायली पाटील, डॉ.प्रशांत शिरुडे, मनीषा शिंदे हे परीक्षक उपस्थित होते. ब्युटीफूल बॉडी व क्लासिक ब्युटी या प्रकारात त्यांचा सहभाग अतिशय सुंदर राहिला त्यामुळे त्यांची मिसेस महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धेच्या प्रथम विजेत्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, अशी कौतुकाची छाप परीक्षकांनी दिली.
बालपणीचे स्वप्न होणार पूर्ण
माझे जन्म गाव एरंडोल तालुक्यातील जवखेडा असून वडील विजयसिंग पाटील शेतकरी आहेत मात्र मी लहानपणी पाहिलेले स्वप्न पूर्ण होत आहे. यात माझ्या पतीसह घरच्यांचा मोठा पाठींबा आहे, अशी माहिती कविता शिंदे यांनी ‘जनशक्ति’शी बोलताना व्यक्त केली. त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून पोदार शाळेच्या प्राचार्या लता उपाध्याय, शरीर सौष्ठवपटू अमोल राजपूत, सुमेरसिंग राजपूत, रत्ना शिंदे, विजय पाटील यांचे त्यांना पाठबळ मिळाले.