चाळीसगावजवळ क्रुझरचा भीषण अपघात : तिघे मजूर जागीच ठार
तीन अत्यवस्थ : भरधाव वाहन अनियंत्रीत झाल्याने हिरापूर गावाजवळ उलटले
चाळीसगाव/भुसावळ : भरधाव क्रुझर वाहन उलटून झालेल्या अपघातात तीन मजूर जागीच ठार झाल्याची घटना बुधवार, 1 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास हिरापूर गावाजवळील महादेव मंदिराजवळ घडली. या अपघातात नाना उर्फ भाउलाल भास्कर कोळी (40) विकास जलाल तडवी (29, दोघे रा.डोंगरगाव, ता.पाचोरा) व मुक्तार तडवी (सार्वे प्र.बो.) हे जागीच ठार झाले तर तिघांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना धुळे येथे उपचारार्थ हलवण्यात आले. मयत मजूर मनमाड येथील एफसीआय गोदामात कामास असल्याचीही माहिती घटनास्थळावरून मिळाली.
वाहन अनियंत्रित झाल्याने अपघात
सूत्रांच्या माहितीनुसार, मनमाड येथून पाचोरा शहराकडे भरधाव वेगाने निघालेली क्रुझर (एम.एच.14 ए सी.5604) ही चालकाचे नियंत्रण सुटल्याने हिरापूर गावापासून काही अंतरावर असलेल्या महादेव मंदिराजवळ उलटली. बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात जागीच तीन मजुरांचा मृत्यू झाला तीन जणांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या क्रूजरमध्ये एकूण 14 प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती असून अन्य आठ प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्याने त्यांच्यावरही चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. अपघातात मयत झालेल्या मजुरांचे मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्याला वेग दिला.
यांची प्रकृती नाजूक
या अपघातात युनूस अल्लारखाँ तडवी, चंदन हरीश खाटीक, समाधान नारायण पाटील यांची प्रकृती नाजूक झाल्याने त्यांना अधिक उपचारार्थ धुळे येथे हलवण्यात आले आहे तर अन्य जखमींवर चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले आहे.