भुसावळ/जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी चौफुलीजवळ भरधाव वेगाने धावणार्या अज्ञात वाहनाने कारला दिलेल्या धडकेत दोन जण ठार झाले असून तीन जखमी झाले. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. आबीद खान अहमद खान पठाण (62, शहादा) व शेख शब्बीर शेख जलदीश (65, खेतीया) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
अज्ञात वाहनाची कारला धडक
जुल्फिकार खान अलमास खान पठाण (42, रा.शहादा) हे त्यांचे सासरे आबीद खान अहमद खान पठाण, सासू रुखसाना आबिदखान पठाण (वय 55), तहसीब रफिक शेख (25) व शेख शब्बीर शेख जलदिश (रा.ेतिया) हे सर्वजण शहादा येथून सोमवारी पहाटे दोन वाजता कारने (एम.पी.46 सी.ओ.901) औरंगाबाद हायकोर्टात तारखेला जाण्यासाठी निघाले असताना पाटणादेवी चौफुलीजवळ त्यांच्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात आबीद खान अहमद खान पठाण (62, शहादा) व शेख शब्बीर शेख जलदीश (65, खेतीया) यांचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह पसार झाला. याप्रकरणी जुल्फिकार खान अलमास खान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.