चाळीसगावसह धरणगावात दुचाकी चोरट्यांची पोलिसांनी भरवली ‘जत्रा’

चोरीच्या 18 दुचाकी जप्त ः शॉर्टकट मणीच्या नादात चोरटे अडकले जाळ्यात

भुसावळ : चाळीसगावसह धरणगाव पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावर तब्बल नऊ दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या बांधल्या असून त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल 18 दुचाकी जप्त केल्या आहेत. धरणगावातील गुन्ह्यात प्रतिष्ठीत घरातील तरुण दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अडकला आहे काही आयटीआय प्रशिक्षीत तरुण शॉर्टकट पैसे कमविण्याच्या नादात दुचाकी चोरीकडे वळल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. धरणगाव पोलिसांनी आठ आरोपींच्या ताब्यातून चार दुचाकींसह तीन दुचाकींचे स्पेअर पार्ट जप्त केले आहेत तर चाळीसगाव शहर पोलिसांनी पातोंडा येथील अट्टल चोरट्याकडून चार लाख रुपये किंमतीच्या तब्बल 11 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.

धरणगाव पोलिसांकडून सात चोरीच्या दुचाकी जप्त
धरणगाव ः धरणगाव पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आठ दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडू चोरीच्या सात दुचाकी जप्त केल्या आहेत. यश दिनेश सातपुते, तुषार महेंद्र बत्तीसे, वैभव उर्फ विक्की हेमंत चौधरी, मनीष ऊर्फ भुर्‍या योगेश चौधरी, सय्यद पीरन सय्यद मुक्ता, वैभव उर्फ दादू सुरेश मोरे, हसन उर्फ अली मोहम्मद शेख, वसीम शेख बिस्मिल्ला अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ही कारवाई धरणगावचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील, पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ, गुन्हे शोध पथकातील उमेश पाटील, समाधान भागवत, विनोद संदानशीव, गोपनीय विभागातील वैभव बाविस्कर आदींनी केली.

अट्टल मोटारसायकल चोरटा चाळीसगाव शहर पोलिसांच्या जाळ्यात
चाळीसगाव शहर पोलिसांनी पातोंडा गावातील अट्टल दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या असून संशयीताच्या ताब्यातून चार लाख रुपये किंमतीच्या तब्बल 11 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरट्याने जळगावसह धुळे व गुजरात राज्यातून या दुचाकी चोरीची कबुली दिली आहे. दरम्यान, चेचीस क्रमांकाच्या आधारावर आता पोलिस प्रशासनाकडून दुचाकी मालकांची ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. विठ्ठल ज्ञानेश्वर रावते (पातोंडा, ता.चाळीसगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
चाळीसगावातील आसीफखान जब्बारखान यांच्या मालकीची 40 हजार रुपये किंमतीची सीडी डिलक्स मोटारसायकल चोरट्यांनी घाटरोड मार्केट परीसरातून मंगळवार, 17 मे रोजी लांबवली होती. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात अज्ञात आरोपीविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाईक राहुल सोनवणे, महेंद्र पाटील व निलेश पाटील यांना आरोपी विठ्ठल रावते याबाबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्यास ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले व चौकशीदरम्यान आरोपीने आसीफ खान यांची चोरलेली दुचाकी काढून देत अन्य चोरलेल्या 10 दुचाकींची कबुली दिली. दरम्यान, आरोपीने या दुचाकी मालेगाव, धुळे, चांदवड, अमळनेर, नांदगाव, येवला तालुका तसेच गुजरात राज्यातून चोरल्याची कबुली दिली आहे.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपअधीक्षक कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक के.के.पाटील, सहाय्यक निरीक्षक सागर ढिकले, सचिन कापडणीस, हवालदार अभिमन पाटील, पोलिस नाईक राहुल सोनवणे, दीपक पाटील, महेंद्र पाटील, भूषण पाटील, रवींद्र पाटील, निलेश पाटील, विजय पाटील, पवन पाटील, शरद पाटील, अमोल भोसले, विनोद खैरनार यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.