मेहकरजवळील अपघातात चाळीसगावातील तिघे तरुण ठार
भावी नवरदेवासह तिघे भीषण अपघातात ठार : मयत चाळीसगावातील रहिवासी
बुलढाणा/चाळीसगाव : साखरपुड्यासाठी निघालेल्या चाळीसगावातील तरुणांच्या अल्टो कारला भरधाव लक्झरीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात भावी नवरदेवासह तिघांचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. बुलढाणाजवळील मेहकर येथे जाताना हा अपघात शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात इंदल चव्हाण (38), योगेश विसपुते (32), विशाल विसपुते (38) या चाळीसगावातील रहिवासी तरुणांचा मृत्यू झाला तर ज्ञानेश्वर रघुनाथ चव्हाण, मिथुन रमेश चव्हाण हे गंभीर जखमी झाले.
साखरपुड्याला जाताना भीषण अपघात
समजलेल्या माहितीनुसार, चाळीसगावातील योगेश विसपुते या तरुणाचा साखरपुडा असल्याने पाच जण अल्टो कारने मेहकरडे शुक्रवारी सायंकाळी उशिरा निघाले होते मात्र शनिवारी पहाटेच्या सुमारास मुंबई-नागपूर महामार्गावरील मेहकर गावाजवळ असलेल्या गजानन महाराज मंदिराजवळ लक्झरीने समोरून जबर धडक दिल्याने या कारमधील तिघे जागीच ठार झाले तर दोघे जखमी झाले.
तिघे जागीच ठार
सूत्रांच्या माहितीनुसार, या अपघातात चाळीसगावातील इंदल चव्हाण (38, सांगवी), योगेश विसपुते (32), विशाल विसपुते (38) यांचा जागीच मृत्यू झाला तर ज्ञानेश्वर रघुनाथ चव्हाण, मिथुन रमेश चव्हाण हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघातात दोघे ठार भाऊ
चाळीसगावातील रहिवासी असलेल्या विशाल विसपुते या तरुणाच्या साखरपुड्यासाठी भाऊ योगेश विसपुते याचादेखील या अपघातात मृत्यू झाल्याने चाळीसगावात हळहळ व्यक्त करण्यात आली. मयत विशाल विसपुते चाळीसगाव कोर्टात वकिलांकडे कारकुनी काम करीत असल्याची माहिती मिळाली तर त्यांच्या पश्चात आई व भाऊ असा परीवार आहे.