चाळीसगावातील लघु पाटबंधारे कार्यालयातील लाचखोर चौकीदारास अटक

जळगाव- शेतजमीन लाभ क्षेत्रात येत नसल्याबाबत ना हरकत दाखला उपविभागीय अधिकार्‍यांकडून तयार क रुन देण्यासाठी 500 रुपयांची लाच स्वीकारणार्‍या चाळीसगावातील लघु पाटबंधारे कार्यालयातील चौकीदार सुरेश बेनिराम वाणी (वय 58) यास धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी पकडले.
तक्रारदारांची चाळीसगाव येथील शेतजमीन लाभ क्षेत्रात येत नसल्याबाबत ना हरकत दाखला पाचोरा येथील लघुपाटबंधारे बांधकाम उपविभागातील उपविभागीय अधिकार्‍यांकडून तयार करुन देण्यासाठी चाळीसगावातील लघु पाटबंधारे कार्यालयातील चौकीदार सुरेश बेनिराम वाणी याने 500 रुपयांची मागणी केली. याबाबत शेतकर्‍याने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या विभागाच्या पथकाने सापळा रचला आणि चाळीसगावातील लघु पाटबंधारे कार्यालयातील चौकीदार सुरेश बेनिराम वाणी (वय 58, रा.दगडी बिल्डींग, तिसरा मजला, नारायणवाडी, चाळीसगाव) यास 500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. चौकीदार सुरेश वाणी याच्या विरुद्ध चाळीसगाव येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.