चाळीसगाव : विवाहितेच्या छळ प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासह दोषारोपपत्र लवकर न्यायालयात सादर करण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच मागून चार हजारात तडजोड करणार्या चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात दोघा कर्मचार्यांना जळगाव एसीबीच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी सात वाजता सिग्नल चौकात रंंगेहाथ पकडल्यानंतर लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. सहाय्यक फौजदार अनिल रामचंद्र अहिरे (वय 52, रा. वैष्णवी पार्क, चाळीसगाव) व पोलिस नाईक शैलेश आत्माराम पाटील (वय 38, रा. चाळीसगाव) अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत.
चार हजारांची लाच भोवली
55 वर्षीय तक्रारदार यांच्या मुलीने चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात सासरची मंडळी हुंडा मागून छळ करीत असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या कागदपत्रांसाठी मदत करू, असे सांगून चार्जशीट लवकरात लवकर पाठवण्याच्या मोबदल्यात दोन्ही पोलिसांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मंगळवारी मागितली. तडजोड झाल्यानंतर चार हजारांची लाच देण्याचे ठरले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. यानंतर रात्री शहरातील सिग्नल चौकात सापळा रचण्यात आला. एका चहाच्या टपरीवर दोघांनी चार लाच स्वीकारताच पंचांसमक्ष पथकाने आरोपींना अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील, पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, निरीक्षक संजोग बच्छाव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक मनोज जोशी, पोलिस नाईक जनार्धन चौधरी, नाईक सुनिल शिरसाठ, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.